सेवानिवृत्तीनंतर टप्प्याटप्प्याने पीएफची रक्कम काढण्याची सुविधा
नव्या ‘एसडब्ल्यूपी’ला मान्यता : ईपीएफओच्या ‘सीबीटी’ बैठकीत महत्त्वाचा निर्णय
- निवृत्तीनंतर नियमित मासिक रक्कम मिळू शकणार
- त्रैमासिक किंवा वार्षिक अशा कालावधीचाही पर्याय
- खात्यातील 90 टक्केपर्यंत रक्कम काढण्याचीही मुभा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ईपीएफओने निवृत्तीनंतर एकाचवेळी पैसे काढण्याऐवजी ‘एसडब्ल्यूपी’ म्हणजेच सिस्टमेटिक विथड्रॉवल प्लॅन मंजूर केला आहे. या सुविधेमुळे पीएफ खातेदारांच्या हातात जेव्हा गरज असेल तेव्हा टप्प्याटप्प्याने पैसे मिळतील. इतर पैसे खात्यात राहिल्यामुळे खातेदाराला व्याज मिळेल. सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या (सीबीटी) बैठकीतील निर्णयानुसार कर्मचारी आता त्यांच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढू शकणार आहेत.
लाखो पगारदार कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे नियोजन थोडे सोपे होऊ शकते. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने सिस्टमेटिक विथड्रॉवल प्लॅनला मंजुरी दिल्याने सेवानिवृत्त होणारे सदस्य त्यांच्या भविष्य निधीची (पीएफ) बचत एकाचवेळी संपूर्ण रक्कम काढण्याऐवजी हप्त्यांमध्ये काढू शकतील. हा निर्णय गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) 240 व्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षस्थान कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी भूषवले.
‘एसडब्ल्यूपी’द्वारे सेवानिवृत्ती बचतीचे रुपांतर एका स्थिर आणि ठराविक उत्पन्न प्रवाहात केले जाऊ शकते. यामुळे सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळेल. महत्त्वाचे म्हणजे, मूळ रकमेची मालकी सदस्याकडेच राहील. या उपक्रमामुळे सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा लक्षणीयरीत्या वाढेल. हे सदस्यांना एक लवचिक आणि विश्वसनीय उत्पन्न प्रवाह प्रदान करेल आणि त्यांच्या कुटुंबाच्या हिताचे संरक्षण देखील सुनिश्चित करेल. ईपीएफओच्या प्राथमिक अंदाजानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात 55 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अंदाजे 6.3 लाख सदस्य या योजनेचा थेट लाभ घेऊ शकतील. याव्यतिरिक्त भविष्य निर्वाह निधी संघटना गिग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना ऐच्छिक योगदान देण्याची परवानगी देण्याची योजना आखत आहे.
‘एसडब्ल्यूपी’ म्हणजे काय?
सिस्टमेटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) ही एक नवीन सुविधा असून त्याअंतर्गत सेवानिवृत्त सदस्य त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील ठेवी एकाचवेळी काढण्याऐवजी मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक अशा निश्चित कालावधीच्या हप्त्यांमध्ये काढू शकतील. यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतरही उत्पन्नाचा नियमित स्रोत मिळेल. पेआउट कालावधीत सदस्याचा मृत्यू झाल्यास, नॉमिनी किंवा अवलंबून असलेली व्यक्ती उर्वरित रक्कम काढू शकेल. त्यांना नियमित पेमेंट सुरू ठेवण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. ही योजना कुटुंबाची आर्थिक सुरक्षा देखील मजबूत करते. सध्याच्या नियमांनुसार, कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर तीन वर्षांच्या आत आपली संपूर्ण ईपीएफ रक्कम काढणे आवश्यक आहे, अन्यथा खाते निक्रिय होते. नवीन प्रणालीत ही अट रद्द करण्यात आले आहेत.
'SWP' बाबत स्पष्टीकरण…
- पैसे काढण्याचे पर्याय : सेवानिवृत्त सदस्यांना मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर एक निश्चित रक्कम काढण्याचा पर्याय असेल.
- मालकी आणि व्याज : सदस्यांना त्यांच्या मूळ निधीवरील मालकी न गमावता नियमित उत्पन्न मिळेल. खात्यातील उर्वरित रकमेवर ईपीएफ व्याज मिळत राहील.
- लवचिकता : संपूर्ण पद्धतशीर पैसे काढणे, एसडब्ल्यूपीद्वारे अंशत: एकरकमी पैसे काढणे किंवा केवळ व्याजासाठी पैसे काढण्याचे पर्याय उपलब्ध असू शकतात.
- वारसदाराचे संरक्षण : पैसे देण्याच्या कालावधीत सदस्याचा मृत्यू झाल्यास, त्याची/तिची नामनिर्देशित म्हणजेच वारसदार व्यक्ती किंवा अवलंबून असलेली व्यक्ती शिल्लक रक्कम एकरकमी काढू शकेल किंवा नियमित पेमेंट मिळवणे सुरू ठेवू शकेल.
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, पीएफ खात्यात शिल्लक ठेवण्याची किमान रक्कम 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजेच एखाद्या खातेदाराच्या खात्यात 10 लाख रुपये शिल्लक असतील तर त्याला पूर्वीच्या नियमानुसार अडीच लाख रुपये खात्यात शिल्लक ठेवावे लागत होते. मात्र, आता नव्या निर्णयानुसार पीएफ खातेदाराला खात्यातून 9 लाख रुपये काढता येतील आणि खात्यात 1 लाख रुपये शिल्लक ठेवता येतील.
Comments are closed.