‘पीयूसी’ प्रमाणपत्राची वैधता आता निम्म्यावर; मोदी सरकारचा कोट्यवधी वाहनचालकांना झटका

देशभरात ई 20 पेट्रोलच्या नावाने वाहनचालकांची ओरड सुरू आहे. हे इंधन म्हणजे मोदी सरकारची फसवेगिरी असल्याची टीका देशभरातून सुरू असतानाच सरकारने कोटय़वधी वाहनचालकांना मोठा झटका दिला आहे. वाहनांना लागणारे 'प्रदूषण नियंत्रणात आहे' दुसऱ्या शब्दांत 'पीयूसी' प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी आता निम्म्यावर आणला आहे. 10 वर्षे जुन्या वाहनांसाठी हे प्रमाणपत्र दर सहा महिन्यांनी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांसाठी आता दर तीन महिन्यांनी या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे सक्तीचे राहणार आहे.

केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात आज राजपत्र अधिसूचना जारी केली. त्यानुसार जुन्या वाहनांना पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याचा कालावधी घटवला आहे. तर, नव्या बीएस-6 श्रेणीतील वाहनांसाठी हा कालावधी वाढवला आहे. 10 वर्षे जुन्या बीएस-4 श्रेणीतील वाहनांना सध्या पीयूसी प्रमाणपत्राची वैधना एका वर्षाची होती. ती आता सहा महिन्यांवर आणली आहे. या वाहनांसाठी दर सहा महिन्यांनी पीयूसी प्रमाणपत्र अपडेट करावे लागणार आहे. वर्षभराची वैधता सर्व मालवाहतूक आणि बिगर मालवाहतुकीच्या वाहनांसाठी लागू होती. 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या बीएस-1, 2 आणि 3 श्रेणीतील वाहनांसाठी दर तीन महिन्यांनी पीयूसी प्रमाणपत्राचे नवीनीकरण करावे लागणार आहे. हा कालावधी सध्या 6 महिने होता.

प्रमाणपत्राची मुदत संपायच्या आधी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केल्यास अंतिम तारखेच्या दुसऱया दिवसापासून प्रमाणपत्राची वैधता सुरू होईल. मुदत संपल्यानंतर नूतनीकरण केल्यास नवीनीकरण केलेल्या तारखेपासून वैधता सुरू होईल.

नव्या बीएस-6 श्रेणीतील वाहनांना दिलासा

सरकारने नव्या बीएस-6 श्रेणीतील वाहनांसाठी दिलासा दिला आहे. या वाहनांना आता पीयूसी प्रमाणपत्राची जास्त वैधता मिळणार आहे. 6 वर्षांपर्यंतच्या नव्या वाहनांसाठी प्रमाणपत्राची वैधता 3 वर्षे असेल. तर  6 ते 10 वर्षे जुन्या  बीएस-6 वाहनांना प्रत्येक वर्षभरानंतर पीयूसी प्रमाणपत्र अपडेट करावे लागेल. 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांसाठी हा कालावधी 6 महिन्यांचा राहणार आहे. मालवाहतुकीच्या वाहनांसाठीदेखील हेच नियम लागू राहणार आहेत.

Comments are closed.