देवदूतांना एक कोटीचे सुरक्षा कवच; विमा चारपट वाढवण्याचा ठाणे पालिका प्रशासनाचा प्रस्ताव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पूर असो, इमारत दुर्घटना असो की आगीचे तांडव… संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाच्या संकटमोचक जवानांना आता एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच मिळणार आहे. सध्याच्या २५ लाखांच्या विमा संरक्षणात तब्बल चारपट वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे, बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनाही या संरक्षणाच्या कक्षेत आणले जाणार आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागात २८ प्रशिक्षित जवान कार्यरत आहेत. पूरस्थिती, इमारत कोसळणे, आग आणि अन्य दुर्घटनांमध्ये हे जवान बचावकार्य करतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांना मिळणारे २५ लाखांचे विमा संरक्षण वाढवून एक कोटी रुपये करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे.

अंतिम मंजुरी महासभेत

सध्याच्या विमा योजनेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. नवीन विम्यासाठी ११ लाख ८ हजार ७२८ रुपयांचा हप्ता अपेक्षित आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी तो महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर जवानांना एक कोटीचे सुरक्षा कवच मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

अधिकाऱ्यांचाही विमा संरक्षणात समावेश

आपत्तीच्या वेळी बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनाही एक कोटी रुपयांच्या विमा संरक्षणात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बचावकार्यात सहभागी होणाऱ्या जवानांसोबतच मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे.

कुटुंबाला आर्थिक आधार आपत्तीच्या ठिकाणी बचावकार्य

करताना जवानांना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. अशावेळी दुर्घटनेत जवानाचा मृत्यू किंवा अपघाती दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विम्याची रक्कम संबंधित जवानाच्या कुटुंबाला, पात्र विमाधारकाला आर्थिक आधार देऊ शकते. या विम्याने जवानांना कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेची चिंता कमी होण्यास मदत होणार आहे.

Comments are closed.