पंडित राम मराठे स्मृती समिती समारोह; ठाणेकरांना शुक्रवारपासून सुरेल मेजवानी, नामवंत कलाकारांचा सहभाग
संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाच्या निमित्ताने शुक्रवार 27 नोव्हेंबर ते रविवार 29 नोव्हेंबरपर्यंत ठाणेकर रसिकांना तीन दिवस सुरेल मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवात शृती मराठे, नंदिनी बेडेकर, स्वप्नील भिसे, वेदश्री खाडिलकर-ओक, पंडित सुहास व्यास, सावनी शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर कलाकार भाग घेणार असून रसिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. गडकरी रंगायतन येथे हा संगीत सोहळा पार पडणार आहे.
ठाणे महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. रात्री 8 वाजता शृती मराठे यांचे गायन तर रात्री 9.30 वाजता पद्मविभूषण डॉ. एम. राजम यांचे व्हॉयोलिनवादन रसिकांना ऐकता येणार आहे. शनिवारी 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता ‘हे बंध रेशमाचे’ हे संगीत नाटक भरत नाट्य मंदिराच्या वतीने सादर केले जाणार आहे.
‘स्वरानुभूती’ आणि ‘अनुभूती’चे सादरीकरण
रविवारी महोत्सवाचा समारोप होणार असून सकाळी 11 वाजता किशोरी आमोणकर यांच्या शिष्या नंदिनी बेडेकर या ‘स्वरानुभूती’ हा कार्यक्रम सादर करतील. दुपारी 4 वाजता यती भागवत व स्वप्नील भिसे यांचे तबलावादन होईल. तर सायंकाळी 5 वाजता गायन-वादन व नृत्याचा आविष्कार असलेला ‘अनुभुती’ हा कार्यक्रम रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. सायंकाळी 7 वाजता ओंकार दादरकर यांचे गायन, 8.30 वाजता पंडित गिरीष संझगिरी यांची मैफल व रात्री 10 वाजता पंडित सुहास व्यास यांचे गायन होणार आहे. 22 नोव्हेंबरपासून गडकरी रंगायतन येथे विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध होणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
Comments are closed.