भिवंडीत धोकादायक इमारतीचा भाग दोन घरांवर कोसळला; तिघे जखमी, तीन मुलांसह महिला गंभीर
भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात धोकादायक इमारतीचा मोठा भाग अचानक दोन घरांवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. मातीचा ढिगारा घरात झोपलेल्या नागरिकांच्या अंगावर कोसळल्याने एका महिलेसह तीन मुले गंभीर जखमी झाली. अबिदा मोमीन (55), खालिद मोमीन (12), उमैरा अन्सारी (6) आणि रय्यान अन्सारी (12) अशी जखमींची नावे आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गौरीपाडा येथील साकुसेठ चाळ परिसरात ही दुर्घटना घडली. सुमारे 40 ते 50 वर्षे जुन्या असलेल्या तीनमजली धोकादायक इमारतीचा स्लॅब आणि गॅलरीचा भाग अचानक कोसळून शेजारील घरांच्या पत्र्यांवर पडला. यामध्ये चौघांच्या डोक्याला, हातापायांना मोठी दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या धोकादायक इमारतीतील उर्वरित रहिवाशांना महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 आणि ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरित करून इमारत पाडण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
कोहिनूर दुर्घटनेनंतर प्रशासन सुस्त झाले
गौरीपाड्यातील या दुर्घटनेनंतर भिवंडी महापालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जुलै महिन्यात कोहिनूर इमारत दुर्घटनेत तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला होता.. त्यानंतरही धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे. इमारत धोकादायक असताना ती वेळेत पाडण्याची किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही का? आणखी किती नागरिकांचे बळी गेल्यानंतरच पालिका प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल भिवंडीकर विचारत आहेत.
आतापर्यंत 95 बळी
भिवंडी शहरात गेल्या वर्षी 1445 इमारती धोकादायक घोषित केल्या होत्या. यावर्षी यामध्ये आणखी भर पडली आहे. यातील 300हून अधिक इमारती अतिधोकादायक असून यामध्ये रहिवासी इमारतींसह कौलारू घरे, यंत्रमाग कारखाना यांचा समावेश आहे. भिवंडीतील धोकादायक इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता पाच वर्षांत 25हून अधिक दुर्घटना घडल्या आहेत. तर आतापर्यंत इमारत दुर्घटनेत 95हून अधिक बळी गेले आहेत.
Comments are closed.