टोरंट प्रकल्पाविरोधात कर्जतमध्ये कँडल मार्च, शिवसेना आणि पर्यावरण बचाव संघर्ष समितीचा पुढाकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विकासाच्या नावाखाली कर्जत भीमाशंकराच्या डोंगरातील हजारो झाडांची कत्तल करून टोरंट, पोशीर प्रकल्प आणि प्रस्तावित शिलार धरणाविरोधात आज हजारो कर्जतकर रस्त्यावर उतरले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या पुढाकाराने कर्जत शहरात जोरदार कँडल मार्च काढण्यात आला. निसर्गाचा मुडदा पाडणारा हा विकास आम्हाला नको, पोलिसी बळाचा वापर करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. कँडल मार्चबरोबरच आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेलाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरकारच्या दंडेलीचा निषेध करण्यात आला.

कर्जतच्या लोकमान्य टिळक चौकात पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने तर कशेळे आणि कळंब बाजारपेठेत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पर्यावरणाच्या प्रश्नावर एकत्र आले. पक्षीय राजकारणापेक्षा कर्जतचा निसर्ग वाचविणे महत्त्वाचे असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा कँडल मार्च काढण्यात आला. हातात मेणबत्त्या घेऊन शेकडो नागरिक या कँडल मार्चमध्ये सहभागी झाले. मेणबत्त्यांच्या प्रकाशात पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत प्रकल्पांविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

… आता माघार नाही

कर्जत तालुक्यातील पर्यावरण बचाव आंदोलनात शिवसैनिक, पर्यावरणप्रेमी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. टोरंट, पोशीर प्रकल्प आणि शिलार धरण रद्द केल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धारच यावेळी करण्यात आला.

आमच्या सह्याद्रीचा गळा घोटू नका !

टोरंट तसेच अन्य प्रकल्पामुळे विजेचा प्रश्न सुटेल तसेच रोजगारही मिळेल, असे सरकार सांगत आहे. मात्र सह्याद्रीचा गळा घोटून केला जाणारा असला विकास आम्हाला नको. हे सर्व प्रकल्प गुजरातला न्या, असा संताप अनेक आंदोलकांनी व्यक्त केला. या कँडल मार्चमध्ये महिला तसेच तरुणांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत निसर्ग वाचवण्यासाठी आरपारची लढाई करण्याची ग्वाही दिली.

Comments are closed.