प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार, सुप्रिया सुळे यांचे राम पूर्णकर यांना आश्वासन
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 54 दिवस उलटून गेले तरी अद्यापि मास्टरमाइंडला अटक करण्यात आली नाही. न्याय मिळण्यासाठी राम पूर्णेकर व त्यांचे कुटुंब वारंवार आंदोलन करीत आहे. तरीही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले असून पूर्णेकर हत्येप्रकरणी आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आवाज उठवणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तसे आश्वासन पूर्णेकर कुटुंबीयांना दिले आहे.
प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी आज ठाण्यात सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना तपासाबाबतची माहिती दिली. पूर्णेकर कुटुंबीयांच्या मागे आम्ही ठाम उभे असून या हत्येप्रकरणी विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांना आवाज उठवण्यास सांगितले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी अधिवेशनात करण्यात येणार आहे.
प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरच्या रात्री मानपाडा भागात पाच जणांनी कार्यालयात शिरून निर्घृण हत्या केली होती. या हत्येतील मुख्य सूत्रधार शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हेच आहेत, असा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबाने वारंवार केला आहे. त्यांच्या अटकेची मागणीदेखील पूर्णेकर कुटुंब करीत आहे. ही हत्या कोणत्या कारणासाठी झाली याचा छडा लावण्याची गरज असल्याचे राम पूर्णेकर यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितले. आपल्या जिवाला धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
…आणि म्हस्केंनी घेतला काढता पाय
सुप्रिया सुळे गडकरी रंगायतन येथे आल्या असता शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के हेदेखील सुळे यांना भेटायला आले. मात्र राम पूर्णेकर मुख्य अतिथी कक्षात असल्याचे समजताच नरेश म्हस्के यांनी गडकरी रंगायतमधून काढता पाय घेतला. त्या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Comments are closed.