Pandharpur News – जळोली येथील बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू
पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उष्मती राहुल गावित (वय 1.5 वर्षे, रा. शिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे. मुलीचा जीव वाचवा यासाठी जिल्हाधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते. बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र यश आले नाही.
22 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जळोली येथील साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजुराची ही बालिका पडली होती. अंदाजे 45 ते 50 फूट खोलवर बालिका अडकल्याची माहिती मिळताच प्रशासन व बचाव पथकांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.
23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाला बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत बालिकेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Comments are closed.