पेट्रोल पंपाजवळील बेकायदा गोदाम पेटले, बोईसरमध्ये मोठी दुर्घटना टळली
बोईसर-चिल्हार मार्गावरील अधिकारी फ्युएल पंपाच्या पाठीमागे असलेल्या एका बेकायदेशीर गोदामाला रविवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान या घटनेने पेट्रोल पंपालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर गोदामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
औद्योगिक आणि व्यावसायिक विस्ताराच्या नावाखाली बेटेगाव परिसरात अनेक ठिकाणी बेकायदा गोदामे उभारली आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही आग लागली त्या परिसरात सुमारे दहा ते बारा ट्रक, जेसीबी तसेच विविध प्रकारची गोदामे आहेत. त्यातच अगदी जवळ पेट्रोल पंप होता. त्यामुळे हा भडका वाहनांपर्यंत किंवा पेट्रोल पंपापर्यंत पोहोचला असता तर मोठ्या आर्थिक नुकसानीसह जीवितहानीचाही धोका निर्माण झाला असता, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पेट्रोल पंप, अवजड वाहने आणि गोदामे एकाच परिसरात असताना अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाचे डोळे उघडतील का, असा संताप व्यक्त होत आहे.
Comments are closed.