पक्षांतरबंदी कायद्यात बदल करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस – TMarathiNews

नवी दिल्ली : आमदार आणि खासदारांकडून राजीनाम्याचा वापर करून पक्षांतरबंदी कायद्यातील अपात्रतेच्या कारवाईतून मार्ग काढला जात असल्याच्या मुद्द्यावर आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली असून, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग, विधी आयोग तसेच केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालय आणि संसदीय कामकाज मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. संबंधित यंत्रणांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. ए. सेथू यांनी ही याचिका दाखल केली असून, आर. सतीश कुमार आणि जतीन यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली.

याचिकेत पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून राजीनाम्याचा मार्ग वापरला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. एखाद्या आमदार किंवा खासदाराविरोधात पक्षांतराची तक्रार दाखल झाल्यानंतर अथवा अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती निर्णय घेण्यापूर्वीच राजीनामा देतात. त्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा होतो. अशा प्रकारामुळे संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरबंदी कायद्याचा उद्देश निष्प्रभ ठरू शकतो, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांनी काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याची मागणी केली आहे. अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास ती कारवाई आपोआप संपुष्टात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित राजीनामा स्वेच्छेने आणि खरोखरच दिला आहे की त्यामागे राजकीय दबाव किंवा अन्य हेतू आहे, याची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची व्यवस्था असावी, असेही याचिकेत म्हटले आहे.

राजीनामे आणि अपात्रतेच्या याचिकांवर निश्चित कालमर्यादेत निर्णय घेण्यात यावा, निर्णय पारदर्शक आणि कारणांसह असावेत, तसेच विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींकडे असलेल्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेचे संस्थात्मक पुनरावलोकन करण्यात यावे, अशा मागण्याही याचिकेत करण्यात आल्या आहेत. सध्या अपात्रतेच्या प्रकरणांमध्ये विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती महत्त्वाची भूमिका बजावतात. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्याची गरज याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

त्रिशंकू विधानसभेतील बहुमत चाचणीबाबतही मागणी

त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास सरकार स्थापनेसाठी बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेबाबतही याचिकेत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. बहुमत चाचणी ही विधिवत स्थापन झालेल्या विधानसभेच्या सभागृहातच व्हावी. त्यापूर्वी निवडून आलेल्या सदस्यांनी संविधानाच्या अनुच्छेद 188 नुसार शपथ घेतलेली असावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. सभागृहाबाहेर समर्थनाची पत्रे किंवा शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून बहुमताचा दावा करण्याऐवजी प्रत्यक्ष सभागृहातच बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षांतरबंदी कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेवर देशभरात चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या याचिकेमुळे पक्षांतरबंदी कायद्यातील संभाव्य सुधारणांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना नोटीस बजावून त्यांची बाजू मागवली आहे. मात्र, याचिकेतील मागण्यांवर न्यायालयाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाची भूमिका समोर आल्यानंतर या प्रकरणातील पुढील सुनावणीत काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.