“कुलदीप अन् सुथार कुठे आहेत?”, सौरव गांगुलींनी उपस्थित केला टीम निवडीवर प्रश्न
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला, जो शुभमन गिल आणि संघ जिंकू शकला असता. वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. न्यूझीलंडचे पाच गडी 70 धावांवर बाद झाले होते; जसप्रीत बुमराहने शानदार सुरुवात करून दिली, पण त्यानंतर प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत आणि हेन्री निकोल्स व ग्लेन फिलिप्स यांच्यात 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली. भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात 720 धावा केल्या, ज्यामुळे पहिल्या डावात 352 धावांची आघाडी मिळाली. आज शेवटच्या दिवशी भारताला 8 गडी बाद करायचे होते, परंतु तसे होऊ शकले नाही. सौरव गांगुलीने संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भारताने पहिला डाव 9 बाद 720 धावांवर घोषित केला होता, ज्यामुळे संघाला 352 धावांची आघाडी मिळाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 गडी बाद केले होते. जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा शानदार सुरुवात करत पहिल्याच षटकात गडी बाद केला. त्याने दोन्ही डावांत टॉम लॅथमला बाद केले. मात्र, फिरकी विभागात थोडी कमतरता दिसून आली, हाच प्रश्न सौरव गांगुलीनेही विचारला. खरं तर पाचव्या दिवशी खेळपट्टी खूपच सपाट होती, जिथे वॉशिंग्टन सुंदरला केवळ 1 बळी मिळाला.
गांगुलीने ‘एक्स’ वर एक पोस्ट लिहीत म्हटले की, “या मालिकेत भारताची कामगिरी शानदार राहिली आहे; आधी व्हाईट बॉल आणि आता रेड बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजी उत्कृष्ट दिसून आली. पण त्यांना हे समजून घ्यावे लागेल की परदेशातील मैदानांवर, जिथे खेळपट्टी जसजसा वेळ जातो तशी अधिक सपाट होत जाते, तिथे आपल्याला एक प्रॉपर स्पिनर खेळवणे गरजेचे असते. कसोटी क्रिकेटमध्ये एक तरी खेळवायला हवा. वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळू शकतो. बीसीसीआय, कुलदीप यादव आणि मानव सुथार कुठे आहेत?”
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल. भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याची वाट खडतर झाली आहे. आता उरलेले सर्व सामने जिंकूनही भागणार नाही; टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यांवर अवलंबून राहावे लागेल.
Comments are closed.