NZvsIND: दुसऱ्या कसोटीतूनही सिराज-जडेजाचा पत्ता कट? कॅप्टन गिलने दिले प्लेइंग इलेव्हनचे संकेत!

न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला. गुरूवारपासून (१९ नोव्हेंबर) खेळला गेलेला हा सामना शेवटच्या दिवसापर्यंत (२३ नोव्हेंबर) गेला, जो अनिर्णीत राहिला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ७२० धावांचा डोंगर उभारून ३५२ धावांची आघाडी घेतली होती, मात्र जिंकण्यात ते अपयशी ठरले.

या सामन्यात भारताच्या अंतिम अकरामधून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना वगळले गेल्याने अनेकांनी कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर गिलने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्याने दुसऱ्या सामन्यात भारताच्या अंतिम अकराबाबतचे संकेतही दिले.

पहिल्या कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गिलने सिराजबद्दल स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “सिराज एक महान खेळाडू आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेणे अत्यंत कठीण होते. आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहोत आणि मी त्याला सुरुवातीच्या काळापासून ओळखतो. बघा, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा एक टप्पा येतो जेव्हा तो त्याच्या सर्वोत्तम लयीत नसतो; आम्ही सध्याच्या फॉर्मचा विचार करून हा निर्णय घेतला.”

“कसोटी सामन्यापूर्वी मी त्याच्याशी चर्चा करून हा निर्णय का घेतला, हे त्याला समजावून सांगितले होते आणि त्याने ते समजूनही घेतले,” असेही गिलने पुढे म्हटले आहे.

वेलिंग्टनमध्ये सिराज आणि जडेजा यांना संधी मिळाली असती, तर सामन्याचा निकाल निराळा असता, हे दावे गिलने फेटाळून लावले. त्याने खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही, असे वक्तव्य केले. तसेच त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनबाबत संकेत दिले.

दुसऱ्या कसोटी सामन्यात तरी सिराज-जडेजा खेळणार का?
न्यूझीलंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी २७ नोव्हेंबरपासून क्राईस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात फारसे बदल होणार नाहीत, असे गिलने सूचित केले. यावरून असेच स्पष्ट होते की सिराज आणि जडेजा यांना दुसऱ्या सामन्यातही संधी मिळणार नाही. गिलच्या मते, ते दोघेही सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाहीत.

“आम्ही आधी खेळपट्टीचे मूल्यांकन करू, पण मला वाटते सध्या असलेले अंतिम ११ मध्ये फारसा बदल होणार नाही,” असे गिल म्हणाला.

भारत पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराह, आकाशदीप, अंशुल कंबोज आणि प्रसिद्ध कृष्णा या वेगवान गोलंदाजांसह खेळला, तर वॉशिंग्टन सुंदर हा एकमेव फिरकीपटू होता. हेच गोलंदाज दुसऱ्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता आहे.

न्यूझीलंड दौऱ्यातील ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२७ (WTC) चा भाग आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिल्याने दोन्ही संघांना WTC च्या गुणतालिकेत नुकसान झाले. भारत चौथ्या स्थानावर कायम असून, न्यूझीलंड दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानी घसरला. दुसरा सामना जिंकून या स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असल्याने भारत सिराजला संधी देणार का याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

तसेच भारताने वेलिंग्ट कसोटीमध्ये स्पेशल फिरकीपटू खेळवला नाही, याबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भारत दुसऱ्या कसोटीमध्ये पुन्हा एकदा सुंदरवरच विश्वास दाखवणार का जडेजाला संधी देणार, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल.

Comments are closed.