वेलिंग्टन कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर भारत WTC2027 च्या अंतिम फेरीत पोहोचणार का? जाणून घ्या समीकरणे
वेलिंग्टन येथे खेळला गेलेला न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी (२३ नोव्हेंबर) लागला आणि तो अनिर्णीत राहिला. हा सामना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२७ (WTC) चा भाग असल्याने लागलेल्या निकालामुळे
गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
या निकालामुळे न्यूझीलंडचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना गुणांना तर मुकावे लागलेच, मात्र त्याचबरोबर ते गुणतालिकेतून पहिल्या दोन स्थानांमधून बाहेर पडले. ते आता तिसऱ्या स्थानावर आले आहेत. दक्षिण आफ्रिका पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे भारतालाही मोठा फटका बसला आहे.
भारताचा सलग दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. याआधी त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा कोलंबो येथे झालेला सामना अनिर्णीत राहिला होता. आता न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामनाही अनिर्णीत राहिल्याने भारताला १६ गुणांचे नुकसान झाले आहेत. तसेच ते ५० टक्केवारीसह चौथ्या स्थानावर कायम राहिले आहेत.
जून २०२७ मध्ये WTC चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे आव्हान कायम असले, तरी भारताला पहिल्या दोन स्थानांसाठी आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहे. त्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताच्या समीकरणांबद्दल जाणून घेऊ.
अंतिम फेरीत पोहण्यासाठी भारताने उर्वरित सहा सर्व सामने जिंकले, तर त्यांचे ६६.६७ टक्के होतील आणि एवढे टक्के पहिल्या दोन स्थानांसाठी पात्र होण्यास पुरेसे आहेत. जर भारताने पाच सामने जिंकले, तर ते जास्तीत जास्त ६१.११ टक्क्यांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे अव्वल दोन स्थानांमध्ये स्थान निश्चित होईल. समजा जर का भारताने चार सामने जिंकले, तर अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात येतील.
२०२७ च्या WTC फायनलसाठी भारताची पात्रता स्थिती-
– इतर निकालांवर अवलंबून न राहता पात्र ठरण्यासाठी, उर्वरित ६ पैकी सर्व ६ सामने जिंकणे आवश्यक आहे.
– जर भारत ६ पैकी १ सामना हरला, तर ऑस्ट्रेलियाला त्यांच्या उर्वरित ९ सामन्यांपैकी किमान ४ सामने हरावे लागतील.
– जर न्यूझीलंडने त्यांच्या पुढील ७ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले (ज्यात घरच्या मैदानावर होणाऱ्या ३ सामन्यांचा समावेश असेल), तर भारत अंतिम फेरीतून बाहेर पडेल; मग जरी भारताने BGT (बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी) ५-० ने जिंकली तरीही.
WTC27 मध्ये भारताचा प्रवास
खेळलेले सामने – बारा
विजय – पाच
गुण टक्केवारी – ५०
या चक्रातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज – शुभमन गिल (११२२ धावा)
या चक्रातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज – मोहम्मद सिराज (४३ विकेट्स)
उर्वरित सामने – न्यूझीलंड (१), ऑस्ट्रेलिया (५)
इंग्लंडविरुद्धची चुरशीची मालिका बरोबरीत सुटल्यानंतर, मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने मालिका पराभूत झाल्यामुळे भारतावर दबाव आला आहे.
पुढे चुकांना फारसा वाव नसल्याने, न्यूझीलंड (परदेशात) आणि ऑस्ट्रेलिया (स्वदेशात) विरुद्धच्या आव्हानांपूर्वी भारताला श्रीलंकेत सर्वोत्तम सुरुवात करणे आवश्यक होते.
देवदत्त पडिक्कलचे शतक आणि मानव सुथारच्या सनसनाटी गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी गॉलमध्ये एक शानदार विजय मिळवला. कोलंबोमध्ये २-० अशी आघाडी घेण्याच्या स्थितीत ते होते, पण श्रीलंकेच्या चिवट पुनरागमनामुळे दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. भारताने मालिका १-० ने जिंकली, तरीही त्यांना या दौऱ्यातून अधिक गुण मिळवण्याची इच्छा होती.
न्यूझीलंडविरुद्धच्या बरोबरीनंतर अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतासमोर मोठे आव्हान आहे. ७२०/९ अशी मोठी धावसंख्या उभारून ३५२ धावांची आघाडी घेऊनही, त्यांना न्यूझीलंडच्या चिवट फलंदाजांना सर्वबाद करता आले नाही आणि त्यामुळे त्यांना गुण विभागून घेण्यावर समाधान मानावे लागले.
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध अजून एक सामना बाकी आहे. तसेच भारताचा मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा जिंकण्याच्या प्रयत्नांमुळे WTC27 अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताची शक्यता वाढू शकते.
Comments are closed.