कार्तीगाई येथे दीपप्रज्वलन कार्यक्रम

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील कर्थीगाई येथे परंपरेनुसार दीपप्रज्वलन करण्यात आले आहे. हे दीपप्रज्वलन करावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. तथापि, या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. प्रत्येक वर्षी ज्या टेकडीच्या दीपस्तंभावर (दीपथून) हे दीपप्रज्वलन होते, तेथेच ते एक वेळची अनुमती म्हणून करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 20 नोव्हेंबर या दिवशी दिला होता.

तथापि, ते काही पुजाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात करण्यात आले. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. अनेक हिंदू संघटना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या संघटनांनी हे दीपप्रज्वलन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दीपस्तंभावरच (दीपथून) करावे असा आग्रह धरला होता. मंगळवारी संध्याकाळी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठाने हे दीपप्रज्वलन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच केले जावे, असा आदेश तामिळनाडूच्या राज्य सरकारला दिला आहे. तसेच, ज्या भाविकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, असाही आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. तथापि, दीपप्रज्वलन परंपरा मोडून अन्य स्थानी करण्यात आल्याने पुन्हा या मंदिरपरिसरात तणाव निर्माण झाला आहे.

प्रकरण काय आहे…

तामिळनाडूच्या मदुराई नगरानजीक टेकडीवर सुब्रमणियन स्वामी या देवतेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या नजीक एक दीपस्तंभ असून या दीपस्तंभावर प्रत्येक वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी दीप प्रज्वलन केले जाते. ही अनेक शतकांची परंपरा आहे. तथापि, काही वर्षांपूर्वीपासून तामिळनाडूच्या द्रमुक प्रशासनाने या स्थानी दीपप्रज्वलन करणे आणि हिंदू भाविकांनी या दिवशी येथे यात्रा करणे यावर बंदी घातली होती. परिणामी, हे प्रकरण न्यायालयात गेले. या मंदिरापासून साधारणत: 1 किलोमीटर अंतरावर मुस्लीमांचा दर्गा आहे. या दर्ग्याच्या दर्शनाला येणाऱ्या मुस्लीमांना या दीपप्रज्वलनाचा आणि हिंदू भाविकांच्या यात्रेमुळे त्रास होतो, या कारणास्तव या प्रज्वलनावर ही बंदी घालण्यात आली होती. तथापि, मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठाने हे दीपप्रज्वलन परंपरेनुसार दीपस्तंभावरच करण्यात यावे, असा स्पष्ट आदेश दिला होता. द्रमुक सरकारने या आदेशाचा भंग केला. त्यामुळे राज्य सरकारविरोधात न्यायायलयाची अवमानना केल्याची याचिका सादर करण्यात आली. नंतर हे प्रकरण सवोच्च न्यायालयात मागच्या वर्षी पोहचले. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा पराभव होऊन टीव्हीके पक्षाची सत्ता आली आहे. तथापि, या सरकारनेही दीपप्रज्वलनाला विरोध केल्याचा आरोप होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक वेळची अनुमती म्हणून या वर्षी दीपस्तंभावरच दीपप्रज्वलन करण्याचा आदेश 20 नोव्हेंबरला दिला. तथापि, प्रज्वलन दीपस्तंभावर न करता ते मंदिराच्या परिसरात करण्यात आले. त्यामुळे हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली असून या संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

भाजपचेही समर्थन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य सरकारने केलेले नाही, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यांनीही या टेकडीवर जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांना अडविण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना टेकडीवर जात असताना ताब्यात घेतले. तथापि, नंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती दिली गेली.

Comments are closed.