दलाई लामा यांचा दिल्लीत सरकारी बंगला
सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था : लुटियन्स दिल्लीत बंगला उपलब्ध
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तिबेटचे आध्यात्मकि धर्मगुरू दलाई लामा यांच्या कार्यालयासाठी केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील अतिमहत्त्वाच्या लुटियन्स परिसरात सरकारी बंगला उपलब्ध करून दिला आहे. या बंगल्याच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, परिसरात उंच हिरवे मेटल पॅनेल, काटेरी तारांचे कुंपण आणि मजबूत प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. तसेच सुरक्षारक्षकांसाठी स्वतंत्र केबिनही तयार करण्यात आली आहे.
लुटियन्स दिल्लीतील पंडित रविशंकर शुक्ला लेन येथे हा बंगला असून, त्याचा क्रमांक 20 आहे. हा बंगला दलाई लामा यांच्या ‘गादेन फोडरंग’ या कार्यालयाला देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बंगल्याचे नूतनीकरण आणि आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू होते.
सुरक्षेसाठी 34.94 लाख ऊपयांचा खर्च
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगल्याच्या सुरक्षेसाठी जुलै महिन्यात 34.94 लाख ऊपयांचे टेंडर जारी केले होते. यामध्ये सुरक्षा केबिन उभारणे, बंगल्याची संरक्षक भिंत मजबूत करणे, काटेरी तारांचे कुंपण बसवणे आणि प्रवेशद्वार अधिक सुरक्षित करण्याच्या कामांचा समावेश आहे.
दलाई लामा यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, वाढत्या वयामुळे प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये राहणे आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे कठीण होत होते. या अडचणी लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालय आणि दलाई लामा यांच्या कार्यालयामध्ये समन्वय साधून हा निर्णय घेण्यात आला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून बंगल्याचे वाटप
मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या वषी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सरकारी निवासस्थानाची मागणी केली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये टाइप-7 श्रेणीतील हा बंगला परराष्ट्र मंत्रालयाकडे कार्यात्मक कारणांसाठी हस्तांतरित करण्यात आला होता.
दलाई लामा यांनी 2011 मध्ये राजकीय अधिकारांचा त्याग केल्यानंतर त्यांचे कार्यालय ’गादेन फोडरंग’ एका खासगी ट्रस्टच्या स्वरूपात नोंदणीकृत करण्यात आले. दलाई लामा हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा वारसा पुढे नेणे आणि मानवतावादी उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही या ट्रस्टची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
ट्रस्टची महत्त्वाची भूमिका
दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीचा मुद्दाही सध्या चर्चेत आहे. 21 मे 2025 रोजी दलाई लामा यांनी त्यांच्या संस्थेचे अस्तित्व पुढेही कायम राहील, असे स्पष्ट केले होते. तसेच भविष्यातील 15 व्या दलाई लामांची ओळख पटवणे, त्यांचे शिक्षण आणि कल्याण यांची जबाबदारी गादेन फोडरंग ट्रस्टकडे असेल, असे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा पुनरावलोकन आयोगाने चीन दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतासोबत राजनैतिक पातळीवर चर्चा करण्याची शिफारसही आयोगाने केली आहे.
Comments are closed.