वैभव शतकवंशी, अवघ्या 53 चेंडूंत ठोकल्या 204 धावा; 28 षटकारांसह यूएईची गोलंदाजी उद्ध्वस्त, हिंदुस्थानचा 14.2 षटकांत विजय

मिसरूडही न फुटलेल्या अवघ्या 15 वर्षे वयाच्या वैभव सूर्यवंशीने जगभरातील रथी-महारथी फलंदाजांना जमला नाही असा भीमपराक्रम मंगळवारी दोहातील मैदानावर केला. यूएईच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी करणाऱ्या वैभवच्या बॅटमधून षटकारांचा महाप्रलय बघायला मिळाल्याने हतरबल क्षेत्ररक्षकांवरही मैदानावर पुतळय़ासारखे उभे राहण्याची वेळ आली. अवघ्या 53 चेंडूंत 204 धावांची ऐतिहासिक खेळी करत वैभवने क्रिकेटमध्ये नवे विश्वविक्रम प्रस्थापित केले. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘अ’ संघाने आशिया चषक रायझिंग स्टार वन डे क्रिकेट स्पर्धेत यूएईचे 250 धावांचे लक्ष्य अवघ्या 14.2 षटकांत केवळ तीन विकेट गमावून 254 धावा करीत पार केले.

वैभव सूर्यवंशीने आपल्या वादळी खेळीत तब्बल 28 षटकार आणि 7 चौकार ठोकून क्रिकेट जगताला अचंबित केले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 384.90 इतका होता. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक आणि द्विशतक झळकावण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. अवघ्या 28 चेंडूंत शतक, 40 चेंडूंत दीडशतक आणि 52 चेंडूंत द्विशतक पूर्ण करत त्याने गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. वैभवच्या 204 धावांपैकी तब्बल 196 धावा चौकार-षटकारांतून आल्या. त्याने हिंदुस्थानच्या एकूण 254 धावांपैकी बहुतांश धावा स्वतःच केल्या. विजयासाठी अवघ्या 5 धावा शिल्लक असताना आणखी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रिंकू सिंगने नाबाद 27 धावा केल्या, मात्र हिंदुस्थानच्या विजयापेक्षा वैभवच्या वादळी द्विशतकाचीच क्रिकेटविश्वात अधिक चर्चा रंगणार आहे.

तत्पूर्वी, यूएईने कर्णधार हरप्रीत सिंगच्या 130 धावांच्या जोरावर 8 बाद 249 धावसंख्या उभारली. यात कर्णधार बसील हमीदने नाबाद 36 धावा केल्या. हिंदुस्थानकडून अर्शद खानने 43 धावांत 4 विकेट घेतले, हर्षित राणा, सूर्यांश शेडगे, हर्ष दुबे व शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

वैभव एक, विक्रम अनेक

वैभव सूर्यवंशीने यूएईच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढत त्याने ‘लिस्ट ए क्रिकेट’मधील सर्वात वेगवान शतक आणि द्विशतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हिंदुस्थानच्या या फलंदाजाने अवघ्या 28 चेंडूंत शतक झळकावत जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम एका चेंडूने मोडीत काढला. त्यानंतर तर त्याच्या बॅटमधून धावांचा जणू पाऊसच कोसळला. पुढील 24 चेंडूंत आणखी शंभर धावा कुटत त्याने अवघ्या 52 चेंडूंत द्विशतक पूर्ण केले. चॅड बोव्सचा 103 चेंडूंत द्विशतक झळकावले होते.

वैभवने या खेळीदरम्यान एका डावात सर्वाधिक 28 षटकार ठोकण्याचा विक्रमही केला. यापूर्वी डार्सी शॉर्टच्या नावावर 2018 मध्ये क्वीन्सलॅण्डविरुद्ध 23 षटकारांचा विक्रम होता.

विशेष म्हणजे ‘लिस्ट ए क्रिकेट’मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक, शतक, दीडशतक आणि द्विशतक असे चारही विक्रम आता वैभवच्या नावावर आहेत. यापूर्वी त्याने श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध अवघ्या 11 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात 28 चेंडूंत शतक आणि 40 चेंडूंत दीडशतक पूर्ण करत त्याने स्वतःचाच 59 चेंडूंचा विक्रमही मोडला. त्यात आता 52 चेंडूंत द्विशतकाची भर पडली आहे.

Comments are closed.