Chandrapur News अंगणवाडीच्या पोषण आहारात चक्क झाडूचा तुकडा, लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; पालकांमध्ये संताप
लहान मुलांच्या पोषणासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या आहारात चक्क झाडूचा तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील इंदिरानगर अंगणवाडी क्रमांक ६ मधून वितरित करण्यात आलेल्या मल्टिग्रेन न्यूट्री पफच्या पॅकेटमध्ये झाडूचा तुकडा आढळला आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शेगाव बु. येथील सचिन नरड यांच्या मुलीसाठी अंगणवाडीतून पोषण आहाराचे पॅकेट देण्यात आले होते. पॅकेट उघडताच त्यातील खाद्यपदार्थांमध्ये झाडूचा तुकडा आढळून आला. हा आहार महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत वितरित केला जातो. संबंधित पॅकेटची निर्मिती नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केली आहे. लहान मुलांच्या पोषण आहारात अशा प्रकारे अस्वच्छ वस्तू आढळत असतील, तर त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी नेमकी होते तरी कुठे, या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित कंपनीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Comments are closed.