भिवंडीला प्रदूषणाचा ‘काळी’मा; सायझिंग, डाईंग कारखान्यांचा धूर ठरतोय जीवघेणा
एमएमआर क्षेत्रातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून भिवंडीची नोंद झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मिनी मँचेस्टरमध्ये चोवीस तास सुरू असलेले यंत्रमाग, गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगी तसेच सायझिंग व डाईंग कारखान्यांमधून बाहेर पडणारा काळा धूर जीवघेणा ठरत आहे. नाकातोंडात जाणाऱ्या धुरामुळे भिवंडीला प्रदूषणाचा ‘काळी’मा लागला आहे. शहराला हजारो गोदामांचा विळखा पडला असून त्यात घातक रसायनांचे साठे आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘येथे प्रदूषणाने सारेच वेढलेले… घेऊ कसा, कुठे मी स्वच्छंद श्वास आता’ असे म्हणण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ पोर्टलवर एमएमआर क्षेत्रात सहा महिन्यांमध्ये कोणती शहरे अधिक प्रदूषित झाली याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात भिवंडीचा प्रथम क्रमांक असून दुसऱ्या नंबरवर मुंबई व तिसऱ्या क्रमांकावर कल्याण शहर असल्याचे म्हटले आहे. भिवंडीची एवढी ‘धूर’धाण का झाली याचा शोध घेतला असता त्यास सायझिंग व डाईंग कारखान्यांमधील आग ओकणारा धूर असल्याचे दिसून आले आहे. भिवंडीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असतानाही त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेने कोणतीही यंत्रणा उभारली नसल्याचे दिसून आले आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खोकला, छातीचे विकार, डोळे चुरचुरणे यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
भिवंडी शहरात 102 सायझिंग आहेत तर कपडा व धाग्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या 100 हून अधिक डाईंग असून त्यात धाग्यावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलर आहेत. त्यातील धुरांडे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणकारी धूर सोडत असतात. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामांमुळे सर्व रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरल्याने प्रदूषण पातळीमध्ये वाढ होत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या सहा महिन्यांचा आढावा घेतला असता ऑगस्ट महिन्यात भिवंडीचा एक्यूआय तब्बल 334 वर गेला होता. तो ‘अत्यंत खराब’ या श्रेणीत दर्शवण्यात आला होता.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश धाब्यावर
शहरात सायझिंग व डाईंग यांच्या बॉयलरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा व इतर तत्सम पदार्थ जाळले जातात. त्यामुळे धुरांड्यामधून मोठ्या प्रमाणावर काळा धूर शहरात पसरत असतो. नुकतेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने सायझिंग व डाईंग यांना बॉयलर पीएनजीवर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तोपर्यंत कोळसा व बायोफॉईल जाळण्यास परवानगी दिली आहे. त्याचे पालन किती जण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.