भिवंडीत शोरमा खाल्ल्याने 14 जणांना विषबाधा; उलटी, जुलाब, मळमळीचा त्रास
शोरमा खाल्ल्याने भिवंडीत 14 जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना आज सकाळपासूनच उलटी, जुलाब, मळमळीचा त्रास होऊ लागल्यानंतर या सर्वांना शहरातील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पाच महिन्यांपूर्वीदेखील शोरमा खाल्ल्यामुळे तब्बल 107 जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वंजारपट्टी नाका परिसरातील ए. के. चिकन शोरमा या दुकानातून सोमवारी रात्री या सर्वांनी शोरमा खाल्ला होता. यातील अनेकांना आज उलटी, जुलाब, मळमळ हा त्रास सुरू झाला. यानंतर एकच कुटुंबातील पाचजण स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. यानंतर आणखी 8 जणांना उपचारासाठी दाखल केले गेले. यामध्ये लहान मुलांसह एका गर्भवतीचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाल्यामुळे रुग्णालयाच्या डॉ. माधवी पंदारे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस रुग्णालयात या घटनेची माहिती घेण्यासाठी दाखल झाले.
पालिकेच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे 15 जून रोजी खंडू पाडा परिसरातील फेमस चिकन शोरमा खाल्ल्यामुळे तब्बल 107 जणांना विषबाधा झाली होती. त्यानंतर भिवंडी महापालिकेने उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली होती. परंतु काही दिवसांनंतर या कारवाया थंडावल्या आणि पुन्हा एकदा गल्लोगल्ली उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणे सुरू झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments are closed.