आऊट होताच ड्रेसिंगरूमध्ये परतलेल्या क्रिकेटपटूचा हार्टअटॅकने मृत्यू
मैदानावर आऊट झाल्यानंतर ड्रेसिंगरूममध्ये परतलेल्या तीस वर्षीय क्रिकेटपटूचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिलिंद पडयार असे त्याचे नाव असून तो मालाड येथे राहत होता. पडयार याच्या अकाली मृत्यूमुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत असून त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिलिंद पडयार याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याचा भाऊ मकरंद हादेखील खेळतो. दोघेही नालासोपारा पूर्वेतील संकेश्वर नगर येथील क्रिकेट संघात होते. आतापर्यंत त्यांनी अनेक सामने खेळले आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोघेही वसई पूर्वेतील बॉक्सस्ट्रीटजवळ असलेल्या एका खासगी क्रिकेट मैदानावर सामना खेळण्यासाठी आले होते.
मिलिंद फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या षटकातील तीन चेंडू खेळल्यानंतर तो झेल बाद झाला. त्यानंतर तो खेळाडू कक्षात परतला. याचवेळी त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्याने ही बाब आपला भाऊ मकरंद पडयार आणि सहकारी मित्रांना सांगितली. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता खासगी वाहनातून मिलिंदला नालासोपारा पूर्वेतील ओझोन रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Comments are closed.