हिंदुस्थान, चीनसह १६ देशांवर डोनाल्ड ट्रम्प नव्याने टॅरिफ लावणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थान, चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपियन युनियनसह एकूण १६ प्रमुख अर्थव्यवस्थांवर नवे आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहे. देशांतर्गत उद्योगांना सरकारी अनुदान (सबसिडी) आणि आर्थिक मदत देऊन हे देश आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वस्त माल विकत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी (USTR) जेमिसन ग्रीर या आठवड्यात यासंदर्भातील चौकशीचा अहवाल जाहीर करण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू असतानाच हे पाऊल उचलले जात असल्याने दोन्ही देशांतील व्यापार संबंधांसाठी हा अत्यंत संवेदनशील काळ मानला जात आहे.

अमेरिकेचा आक्षेप काय?

परदेशी सरकारे आपल्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात अनुदान आणि धोरणात्मक पाठबळ देत असल्याने तेथील कंपन्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन घेतात आणि कमी किमतीत माल निर्यात करतात, असा अमेरिकेचा दावा आहे. यामुळे अमेरिकन कंपन्यांना स्पर्धेत टिकणे कठीण होत असून स्थानिक उत्पादन क्षेत्र कमकुवत होत असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.

या नव्या टॅरिफमध्ये संबंधित देशांतून आयात होणाऱ्या बहुतांश वस्तूंचा समावेश असेल. मात्र, पोलाद (स्टील), ॲल्युमिनियम आणि ऑटोमोबाईल क्षेत्रावर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आधीच स्वतंत्र शुल्क लागू असल्याने त्यांना यातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानवर किती शुल्क आकारले जाऊ शकते?

नव्या शुल्काचे अंतिम दर अद्याप निश्चित झालेले नसले तरी, फेब्रुवारी २०२६ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या २०२५ च्या टॅरिफ दरांइतकेच हे दर असू शकतात.

Comments are closed.