एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून कमिशनचा आकडा 25 टक्क्यांवर गेला, संजय राऊत यांचा टोला

अण्णाभाऊ साठे यांच्या प्रकल्पात 5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरसिंग उदगीरकर यांनी केला होता. या पार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून कमिशनचा आकडा 25 टक्क्यांवर गेला असा टोला शिवसेना नेता, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच संपूर्ण राज्याची कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. कारण भाजपने गुंडाना आश्रय देण्याचे काम केले आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे रसातळाला गेली आहे. मुंबई, पुणे आणि मुख्यमंत्र्यांच गाव नागपुरातही हीच अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तपदी कार्यक्षम अधिकारी नेमलेले आहेत. असं असताना राजकीय कार्यकर्त्यांचे ठाण्यात खुन होतात, व्यापाऱ्यांवर गोळीबार होत आहेत. न्यायालयाच्या आवारात घुसून एका व्यक्तीवर गोळीबार केला जातो. क्रूरपणे त्याचे हात तोडले जातात, आणि जनता हे सर्व पाहते. वकील आणि न्यायदेवता पाहतेय. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री असं म्हणतात हे खपवून घेतलं जाणार नाही. म्हणजे काय खपवून घेणार नाही? गेली अडीच ते तीन वर्ष तुमचं सरकार आहे. राज्यात खून, अपहरण, खंडणीखोरी सुरू आहे. त्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे कुठे? पोलीस काय करत आहेत? पोलीस विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटीसा पाठवत आहेत. सोशल मीडियावर आम्ही जे लिहितो त्यावर पोलीस लक्ष ठेवत आहेत आणि त्यांना नोटीसा पाठवत आहेत. जे तरुण आंदोलक आहेत, ते व्यक्त होतात त्यांना नोटीसा बजावत आहेत, अशी फडतूस कामं पोलीस करत आहेत. रस्त्यावर खुन होत आहे, हत्या होत आहे, अपहरण होतंय पण पोलिसांचं लक्ष नाही. पुणे हे विद्येचे माहेरघर होतं, आता गुंडांचं माहेरघर झालं आहे. पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत? नागपुरातही असंच वातावरण आहे. कायद्याचे राज्य नाही याचा अर्थ गृहमंत्रालय अपयशी आहे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशी अनेक प्रकरणं गेली वर्षभरात मुंबई, पुण्यात आणि ठाण्यात घडत आहेत. आणि राज्याचे गृहमंत्री अत्यंत मजेत आणि संथपणे इथे तिथे फिता कापत फिरत आहेत. ठाण्यात पुर्णेकरांची हत्या झाली मुख्यमंत्र्यांनी काय केले? जे पुरावे पोलिसांनी द्यायला पाहिजे होते ते पुरावे पुर्णेकरांच्या मुलाने दिले आहेत. तरीही कारवाई होत नसेल तर गुन्हेगाराचं मनोबल वाढणार. न्यायालयाच्या आवारात जर गुन्हेगार घुसतात, याचा अर्थ गुंडांनी समांतर अशी न्यायव्यवस्था तयार केली आहे. आम्हाला जो न्याय हवाय तो करू अशी या गुडांची मानसिकता तयार झाली आहे. कारण त्यांचे संरक्षक, पालनकर्ते सरकारमध्ये बसले आहेत. जे वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ होऊन आज सरकारमध्ये बसलेले आहेत. आणि त्यांच्याच भरोशावर मुंबई, ठाणे, नागपुर आणि पुण्यात गुंडगिरी सुरू आहे. या काही हाय प्रोफाईल घटना आहेत त्या वृत्तपत्रात दिसत आहेत. पण संपुर्ण महाराष्ट्रात गुंडांचा धुमाकूळ सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडे ज्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे तिथे कायदा सुव्यवस्था नाहीये. ही परिस्थिती फक्त पुण्याची नाहिये. संपूर्ण राज्याची कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. कारण भाजपने गुंडाना आश्रय देण्याचे काम केले आहे. आणि याच गुंडं टोळ्यांच्या मदतीने ते निवडणुका जिंकतात. याच गुंड टोळ्यांना समाजसेवा करण्याची संधी दिली जाते. यातलीच काही लोकं युथ फेस्टिवलमध्ये सहभागी होतात. हातात मराठी पुस्तकं घेतात आणि अशा लोकांना प्रतिष्ठा देण्याचं काम सुरू आहे. सर्वत्र खंडणी मागितली जाते आणि खंडणी दिली जाते. आणि जे नकार देतात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात. गेल्या 40 वर्षांपासून मी अंडरवर्ल्डचा अभ्यासक आहे. या क्षणी मुंबईतले सर्व व्यापारी, ज्वेलर्स, प्रोड्युसर्स खंडणी देत आहेत. आणि जे नकार देत आहेत त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी गोळ्या झाडल्या जात आहेत. पण बहुसंख्य बिल्डर्स, व्यापारी, ज्वेलर्स, प्रोड्युसर्स खंडणी देऊन या क्षणी जिवंत आहेत. अन्यथा त्यांचा मृत्यू होईल असेही संजय राऊत म्हणाले.

विरोधी पक्ष नेता हा फक्त लाल दिव्याची गाडी, विधीमंडळ कार्यालय, दोन सेक्रेटरी आणि प्रोटोकॉल याच्यापुरता नसतो. तुम्ही त्या पदावरती आहात किंवा नाहीत, तरी तुम्ही विरोधी पक्षनेते पदाचं काम केलं पाहिजे आणि लोकांना राज्यात काय चाललंय हे उघड केलं पाहिजे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना याबाबत जाग आलेली दिसत नाही. ते फक्त मुख्यमंत्री कधी विरोधी पक्ष नेता नेमतात याच्यावर त्यांचे लक्ष आहे. ते जर नेमणार नसतील तर आपण आपलं काम केलं पाहिजे, आम्ही ते करत आहोत. कारण जनतेने आम्हाला ती जबाबादारी दिली आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

संजय शिरसाट यांना कुणीही ब्लॅकमेल करत नाहिये. यावर लोकांचा विश्वास बसेल का? की फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री बिनपैश्यांनी काम करू शकतात. सगळ्यांची ब्रेन मॅपिंग टेस्टिंग करा सगळ्यांची. कमिशन घेतल्याशिवाय एक तरी मंत्री सामान्यांच्या प्रकल्पांवर काम करू शकतील का? हा प्रश्न स्वतः मंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. विरोधीपक्षाचा नेता म्हणून नरसिंग उदगीरकर माझ्याकडे हतबलतेने हे तक्रार घेऊन आले. ते मातंग समाजाचे नेते आहेत. मी अण्णा भाऊ साठेंशी भावनिकदृष्ट्या जोडलेला आहे. अण्णा भाऊंच्या नावाने कुणी पैसे मागू नये, त्यांच्या नावाने प्रकल्प झाला पाहिजे, संबंधित नरसिंग यांना संबंधित मंत्र्याने 72 व्या माळ्यावर बोलवून चर्चा केली की नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे. शिरसाट यांनी किती प्रकल्प मंजूर केले हे सरकारी रेकॉर्डवर आहे. ज्या अर्थी त्यांनी एकही प्रकल्प मंजूर केला नसेल तर याचा अर्थ ते आकार्यक्षम आहेत. समाजकल्याणासाठी असलेले उत्तम प्रकल्प मंजूर करणं हे त्याचं काम आहे. मध्ये शिरसाट यांनी फ्लेवर्ड दुधाचा विषय आणला होता. कोट्यवधीचा विषय होता तो, हा विषय आम्ही काढणार नाही. पण अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने उभं राहत असलेला प्रशिक्षण केंद्र ही मातंग समाजातल्या एका पिढीची गरज आहे, ते व्हायला पाहिजे. पैसे खाण्याला मर्याद आहेते. तुम्ही टक्केवारी एकदा ठरवून घ्या, 20 टक्के जास्त होत आहेत असं माझं म्हणणं आहे. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एक दर ठरवा. पैसे खाणं हे सध्या राज्यात गुन्हा किंवा अपराध नाही. सध्याच्या राजवटीत अव्वाच्या सव्वा कमिशन मागणं आणि कमिशन घेऊनही काम न करणं, हा गुन्हा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून कमिशनचा आकडा 25 टक्क्यांवर गेला आहे. त्या पुर्वी यांचं दहा टक्क्यात काम चालायचं. हा नवीन आकडा म्हणजे एवढी हाव आहे. या प्रकल्पासाठी एकनाथ शिंदेंना पत्र लिहिणार आहे. आणि पाच कोटींसाठी हे अडलं असेल तर आम्ही पाच कोटी तुम्हाला आणून देऊ असं या पत्रात म्हणणार आहे. फक्त हे पैसे रोख रक्कम हवी आहे की धनादेशात त्यांनी सांगावे. कारण हे खोके आहेत, परत आम्हाला ईडीला सांगावं लागेल की आम्ही रोख रक्कम देत आहोत म्हणून. अण्णा भाऊ साठेंच्या प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांची लाच आम्ही देणार. माझ्याकडे माहिती आलेली आहे, माझ्याकडे माणूस आला, त्यांनी मला सांगितलं मला पटलं ते मी समोर माडंलं. अशी अनेक प्रकरणं येतात, मला पटत नाही तेव्हा मी मांडत नाही. आणि आम्हाला धमक्या देऊ नका, कुणी कुणाला ब्लॅकमेल करत नाहीत. तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही चुकलात तुमच्यावर टीका होणार, तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. हे राज्या कुणाच्या बापाचं नाही, हे राज्य 12 कोटी जनतेचं हे राज्य आहे, आणि हे राज्य बनवण्यात अण्णा भाऊ साठे याचं मोठं योगदान आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील धोरणात्मक निर्णयांबाबत पक्षातील कोणी भूमिका मांडत असेल, तर त्यावर बाहेरील पक्षाच्या नेत्याने बोलू नये, असे संजय राऊत म्हणाले. रोहित पवार गेल्या अनेक काळापासून विविध प्रश्नांवर संघर्ष करत आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची लढाई त्यांनी एका टप्प्यापर्यंत नेऊन ठेवली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते पंढरपूर येथे उपोषणाला बसले. आता ते विदर्भात ट्रॅक्टर मोर्चा काढत आहेत. हे तिन्ही विषय महाराष्ट्रातील जनजीवनाशी संबंधित आहेत. जनतेच्या दृष्टीने हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. रोहित पवार विरोधी पक्षाचे काम करत आहेत. त्यांच्या पक्षात नेमके काय सुरू आहे, याबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे शेतकऱ्यांच्या हिताचे, लोकहिताचे आणि जनहिताचे नक्कीच आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रोहित पवार हे एक महत्त्वाचे नेते आहेत. तसेच ते पवार कुटुंबाचेही महत्त्वाचे सदस्य आहेत. असे असताना त्यांना मुद्दाम कोणीतरी लक्ष्य करत आहे किंवा त्यांच्याबाबतीत काही वेगळे घडवून आणत आहे, यावर माझा विश्वास नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.