केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकतो, इतकी दिलदारी भाजपकडे आहे; संजय राऊत यांचा जोरदार टोला
सुप्रिया सुळे यांना भाजपकडून मुख्यमंत्रिपद देऊ शकतं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभुमीवर केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकतो, इतकी दिलदारी भाजपकडे आहे असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच 10 आमदारांची ताकद असलेला पक्ष आणि त्यामध्येही तीन गट असताना सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार असतील, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री केले जाणार असेल, तर महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळतील. हा एक विक्रम ठरेल. केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाला भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो, इतकी दिलदारी भाजपकडे आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरच आम्ही आमची भूमिका व्यक्त करू, असेही त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार असतील, तर शिवसेना त्यांना समर्थन असेल का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, यासंदर्भात आम्हाला पक्षात माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागेल. तेच याबाबत निर्णय घेतील. मात्र, मला व्यक्तिगत विचाराल, तर सुप्रियाताई सुळे खरोखर मुख्यमंत्री होणार असतील, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. 10 आमदारांची ताकद असलेला पक्ष आणि त्यामध्येही तीन गट असताना सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार असतील, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. सुप्रियाताई आमच्या घरातील सदस्य आहेत. त्या मुख्यमंत्री होणार असतील, तर आम्हाला आनंदच आहे. त्यांनी आधी शपथ घेऊ द्या. शपथ घेतल्यानंतरच आम्ही आमची भूमिका मांडू, असेही संजय राऊत म्हणाले.
बारा वर्षांपासून केवळ शपथच घेत आहोत, असे त्या स्वतः म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य आम्हाला फार हृदयाला लागले होते. त्यामुळे बारा वर्षांनंतर त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असतील, तर आम्हाला आनंदच आहे. सध्या राज्यात जी व्यवस्था आहे, त्यापेक्षा ही व्यवस्था उत्तम राहील, असे आमचे म्हणणे आहे. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी पक्षातर्फे माझी भूमिका मांडेन. तसेच त्यांच्या शपथविधीलाही मी उपस्थित राहीन, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
डिलिमिटेशन विधेयकाबाबत इंडिया आघाडीत चर्चा होणार
विरोधी पक्ष म्हणजे एकच पक्ष नसतो. आज देशात इंडिया ब्लॉक म्हणजेच आमची आघाडी हे प्रमुख विरोधी पक्षांचे व्यासपीठ आहे. डिलिमिटेशन विधेयक देशाच्या हिताचे आहे का, लोकशाहीच्या हिताचे आहे की देशाच्या आणि जनतेच्या विरोधात आहे, यावर आमच्या आघाडीत चर्चा होईल. आम्ही सर्वजण एकत्र बसून याबाबत निर्णय घेऊ. या चर्चेत सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्षही सहभागी असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
पंजाबमध्ये मोठा भाऊ कोण, हे आताच सांगा!
पंजाबमध्ये मोठा भाऊ कोण, हे आताच सांगा, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ज्या मुद्द्यावरून शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली, तो शेतकऱ्यांचा मुद्दा होता. शेतकरी आंदोलन करत होते. तीन काळे कायदे आणण्यात आले होते. मात्र, आता हा संपूर्ण विषय संपला आहे का? देशातील शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला आहे का? शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (MSP) मिळाली आहे का? शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत का? यापैकी काहीही झालेले नाही, असे संजय राऊत म्हणाले. भाजपसोबत राहणे ही दोन्ही पक्षांची मजबुरी आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
Comments are closed.