जोपर्यंत शरद पवारांनी जन्माला घातलेला पक्ष त्यांना मिळत नाही, ही लढाई सुरूच राहणार – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही शरद पवार यांनी केली हे वास्तव आहे. पण सगळे पुरावे देऊनही शरद पवारांवर अन्याय झालेला आहे. त्यामुळे जोपर्यंत शरद पवारांना न्याय मिळत नाही, आमची पक्षासाठीची लढाई सुरूच राहील, असा ठाम निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री पदाच्या अफवांवरही पूर्णविराम दिला.

मुंबईत सुप्रिया सुळे यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील हक्काच्या लढाईपासून ते राज्यातील वाढत्या गुन्हेगारीपर्यंत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही शरद पवार यांनी केली असून ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. आमची केस ही चाललेली आहे. इलेक्शन कमिशन मध्ये आम्ही सगळे कागदपत्र देऊन, पुरावे देऊनही पवार साहेबांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे आमची पक्षासाठीची ही लढाई ही कालही होती आजही आणि उद्याही राहील. जोपर्यंत शरद पवारांना न्याय मिळत नाही आणि त्यांनी जन्माला घातलेला पक्ष त्यांना स्वतःला मिळत नाही ही लढाई चालू राहणार, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी केला.

“ज्याच्याकडे मॅजिक नंबर आहे तोच मुख्यमंत्री होऊ शकतो”

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नांवरही आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांपेक्षा जनतेचे प्रश्न, विकास आणि नागरिकांची सुरक्षितता हेच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मी कुणाची लेक आहे विसरू नका, मी नेहमी वास्तवतेत जगते. गेल्या 40 वर्षांच्या दादाच्या स्टेटमेंट काढून बघा या राज्यामध्ये ज्याच्याकडे मॅजिक नंबर आहे तोच मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या पत्रकारने काहीतरी बालिश लिहिलं म्हणून मी काही बोलणं काही क्रमप्राप्त नाहीये. मी खूप सिरियस पॉलिटिशियन आहे, मी एक सिरियस पॉलिसी मेकर आहे. मी या गॉसिपमध्ये माझा वेळ वाया घालवत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघानी मला गॉसिप करायला दिल्लीला पाठवलेलं नाही. मला काम करायला आणि या राज्याची आणि देशाची सेवा करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सगळे जे गॉसिप आजकाल करतात याचं मला खूप वाईट वाटतं, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

“पुण्यात आणि मुंबईत घडलेल्या घटना गंभीर”

पुण्यातील गोळीबाराच्या घटनेसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, या प्रकरणी त्यांनी कालच मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात त्यांनी ट्वीटही केले होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. केवळ देशातूनच नव्हे तर, जगभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. अशा शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतील तर, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. अनेक विद्यार्थ्यांची मी गार्डियन म्हणून जबाबदारी सांभाळते. पुण्याला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात, समाजकारणात तसेच विकासात एक वेगळी ओळख आणि मानाचे स्थान आहे. अशा पुण्यात आणि काल मुंबईत घडलेल्या घटना गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांनी या विषयांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. आम्हाला या प्रकरणात कुठलंही राजकारण करायचं नाही, पण सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षिततेची जबाबदारी जे कोणी तत्कालीन सरकार आहे त्यांनी घेतलीच पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील गुन्हेगारीसाठी प्रशासनाची जबाबदारी निश्चित करा

पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी प्रशासन आणि यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, मला वैयक्तिक कोणाबद्दलही बोलायचं नाही. मी प्रशासन आणि यंत्रणेवर बोलेन. समस्या प्रशासनाची आणि यंत्रणेची आहे. महाराष्ट्र पोलीस अतिशय उत्तम आहेत आणि प्रत्येक पोलिसाचा मला सार्थ अभिमान आहे. आज पोलीस दलात काम करणारे कर्मचारीही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. त्यामुळे पोलिसांवर जे प्रशासक बसलेले आहेत, त्यांनी या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याशी आपले वैयक्तिक मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीचा संदर्भ देत महाराष्ट्रात पुण्यात सर्वाधिक गुन्हे नोंदवले जात असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Comments are closed.