इथे आता कोण सुरक्षित आहेत? महाराष्ट्राच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका! संजय राऊत यांचे फडणवीसांवर टिकास्त्र

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर दिवसाढवळ्या झालेली हल्ल्याची घटना आणि त्यानंतर दौंडमध्ये अंगणवाडी सेविकेवर झालेला कोयता हल्ला यावरून संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. संजय राऊत यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

पुणे न्यायालयाच्या आवारात गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरण ताजे असतानाच पुणे ग्रामीण भागात दौंड तालुक्यातील लडकत वाडी येथे जयश्री रासकर या अंगणवाडी शिक्षिकेवर कोयता हल्ला झाला आहे. नेहमी प्रमाणे पोलीस गप्पगार आणि आरोपी मोकाट आहेत. इथे आता कोण सुरक्षित आहेत? फडणवीसजी महाराष्ट्राच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

खुलेआम गोळीबार, हत्या आणि अपहरण हे रोजच घडतंय. हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा व्यवसाय झाला आहे. आणि गृहमंत्री काहीच करू शकत नाही, हताश आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे आव्हान आहे. त्यांना गृहखातं सांभाळता येत नाहीये, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली.

Comments are closed.