मुंबई विजयासह अव्वल उत्तराखंडवर 86 धावांनी दणदणीत विजय
दमदार अष्टपैलू कामगिरी करत मुशीर खान हा पुन्हा एकदा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तराखंडविरुद्ध 209 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर मुंबईने उत्तराखंडचा 123 धावांत खुर्दा उडवत 86 धावांनी दणदणीत विजय साकारला. मुंबईचा हा सहावा विजय ठरला.
मुंबईने या सामन्यात दणक्यात सुरुवात केली. अंगक्रिश रघुवंशी आणि हार्दिक तामोरे यांनी दणकेबाज सुरुवात केली. हार्दिकने 14 चेंडूंतच सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 39 धावांची दमदार खेळी साकारली. हार्दिक बाद झाल्यावर रघुवंशी आणि मुशीर खान यांची चांगलीच जोडी जमली. रघुवंशी आणि मुशीर यांच्या चोरटी धाव घेताना घात झाला. यामध्ये रघुवंशीला तंबूत परतावे लागले, त्याने 34 चेंडूंत 51 धावा केल्या. रघुवंशी बाद झाल्यावरही मुशीरने धडाकेबाज फटेकबाजी केली. मुशीरला त्यावेळी सर्फराझची चांगली साथ मिळाली. सर्फराझ 31 धावांवर बाद झाल्यावरही मुशीरने फटकेबाजी सुरूच ठेवली. मुशीरने 40 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 65 धावांची सर्वाधिक खेळी साकारली. त्यामुळे मुंबईला 209 धावांचा डोंगर उभारता आला.
मुंबईच्या 210 धावांचा पाठलाग करणाऱया उत्तराखंडला शिवम दुबेने आपल्या एकमेव षटकात पहिला धक्का दिला. त्यानंतर अथर्व अंकोलेकर, साईराज पाटील, मॅक्सवेल स्वामिनाथन आणि मुशीर खान यांनी अचूक गोलंदाजी करत उत्तराखंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले. उत्तराखंडचा संघ 17 व्या षटकात 123 धावांत ऑल आऊट झाला आणि मुंबईने अपराजित राहत अव्वल स्थान कायम ठेवले.
Comments are closed.