टीम इंडिया पहिल्या दिवशी निष्प्रभ, न्यूझीलंडची 5 बाद 246 अशी मजल; दोन जीवदानांमुळे पाहुण्यांनी पकड गमावली

टीम इंडियाची गोलंदाजी पहिल्याच दिवशी उघडी पडली. कारण टीम इंडियाने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली असली तरी त्यांना या गोष्टीचा फायदा घेता आला नाही. हिंदुस्थानने दिलेल्या दोन जीवदानांमुळे त्यांची खेळावरीव पकड ढिली झाली. टीम इंडियाच्या बोथट माऱ्यामुळे न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर पाच विकेट्स गमावून 246 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टॉम ब्लंडेल 53 धावांवर आणि ग्लेन फिलिप्स 36 धावांवर खेळपट्टीवर होते. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 62 धावांची नाबाद भागीदारी केली होती.

पहिल्या सत्रात बोथट दाबा

कसोटीचे पहिले सत्र हे गोलंदाजीसाठी नंदनवन समजले जाते. पण या पहिल्या सत्रातच टीम इंडियाचा बोथट मारा पाहायला मिळाला. त्यामुळे पहिल्या सत्रात हरवलेली लय हिंदुस्थानला अखेरपर्यंत सापडली नाही. न्यूझीलंडला टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी 77 धावांची सलामी दिली. हिंदुस्थानला पहिल्या सत्रात फक्त कॉनवेलाच बाद करता आले. त्याने 31 धावा केल्या.

दुसऱ्या सत्रात शून्य धावांत तीन विकेट

दुसऱ्या सत्रात हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही आणि त्यांची पकड ढिली झाली. हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अवघ्या 13 मिनिटांत तीन विकेट घेऊन न्यूझीलंडला हादरवले. न्यूझीलंडला सलग तीन षटकांत तीन धक्के बसले. न्यूझीलंड 110 धावांवर असताना हे तीन धक्के बसले. न्यूझीलंडची धावसंख्या 110 असताना कर्णधार टॉम लॅथम बाद झाला. दिवसाच्या पहिल्याच षटकात पायचीतच्या निर्णयाला आव्हान देऊन लॅथमने आपली विकेट यशस्वीपणे वाचवली. त्यानंतर दुसऱया स्लिपमध्ये उभ्या असलेल्या के. एल. राहुलने एक तुलनेने सोपा झेल सोडल्याने त्याला आणखी एक जीवदान मिळाले. या गोष्टींचा फायदा घेत लॅथमने आपले 32 वे कसोटी अर्धशतक झळकावले. 42 व्या षटकात आकाश दीपने लॅथमला बाद करण्यापूर्वी, त्याने 128 चेंडूंमध्ये सहा चौकारांसह 59 धावा केल्या.

त्यानंतरच्याच 43 व्या षटकात अंशुल पंबोजने हेन्री निकोल्सला बाद केले. निकोल्स केवळ 16 धावाच करू शकला. आकाश दीपने 44 व्या षटकात रचिन रवींद्रला शून्यावर बाद केले आणि अशा प्रकारे शून्य धावांत न्यूझीलंडने तीन फलंदाज गमावले होते. त्यावेळी हिंदुस्थानला आघाडी घेण्याची चांगली संधी होती, पण या संधीचे सोने त्यांना करता आले नाही.

आता दुसऱया दिवशी न्यूझीलंड एकीकडे मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असेल, तर दुसरीकडे हिंदुस्थानचे गोलंदाज किवी संघाचा पहिला डाव लवकर उधळून लावण्याचा प्रयत्न करतील. हिंदुस्थानसाठी आकाश दीपने आतापर्यंत दोन विकेट्स घेतले आहेत.

तिसऱ्या सत्रात संधी गमावली…

तिसऱया सत्रात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर ध्रुव जुरेलने डॅरिल मिचेलचा झेल घेतला. मिचेल 31 धावाच करू शकला. मिचेलने ब्लंडेलसोबत पाचव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. मिचेल बाद झाल्यानंतर हिंदुस्थानला न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलण्याची संधी होती, पण हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी केली आणि सुवर्णसंधी गमावली. ग्लेन फिलिप्स आणि ब्लंडेल यांनी संयमाने खेळ करत संघाला कोणताही धक्का बसू दिला नाही.

के. एल. राहुलची चूक महागात पडली

के. एल. राहुलच्या जीवदानाचा फायदा घेत लॅथमने आपल्या कारकीर्दीतील 32 वे अर्धशतक झळकावले. लॅथम 29 धावांवर असताना के. एल. राहुलने त्याचा झेल सोडला. मिळालेल्या या संधीचा लॅथमने पुरेपूर फायदा घेतला आणि सहा चौकारांसह 128 चेंडूंमध्ये 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 32 वे आणि हिंदुस्थानविरुद्धचे नववे अर्धशतक होते.

ऋषभ पंतने दिले मिचेलला जीवदान

न्यूझीलंडच्या डावाच्या 56 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने डॅरिल मिचेलला जीवदान दिले. मिचेलने लेग साईडला पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजच्या बाजूने जाऊन यष्टीमागे गेला. ज्यामुळे यष्टिरक्षक ऋषभ पंतला त्याचा फायदा घेता आला नाही. चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी पंतने उडी मारली, पण त्याला हा झेल टिपता आला नाही.

Comments are closed.