छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाल
छगन भुजबळांवर माणिकराव कोकाटे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Cabinet Expansion) सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. आता यावरून मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, मला वाटत नाही की छगन भुजबळ नाराज असतील. ते 20 वर्षापासून मंत्री आहेत, त्यामुळे नाराज असण्याचे काही कारण नाही. त्यांचे काही गैरसमज असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ते गैरसमज दूर होतील आणि लवकरात लवकर ते कामाला लागतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
अजित पवारांना टार्गेट करण्याची आवश्यकता नाही
छगन भुजबळ यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेच पक्षाचा निर्णय घेतात. आम्हाला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत शून्य स्थान आहे, असे म्हटले. तसेच अजित पवारांना छगन भुजबळ यांनी टार्गेट केले. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, ते चुकीचे आहे. अजित पवारांना टार्गेट करण्याची आवश्यकता नाही. अजित पवारांनी सर्वसमावेशक निर्णय घेतलेला आहे. सर्व समाजाच्या लोकांना त्यांनी न्याय दिला आहे. ज्या ओबीसी समाजाची आपण चर्चा करतो त्या ओबीसी समाजाज्याच्या 17 नेत्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाले आहे. तर 16 लोक मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे समाजावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. अजित पवारांनी अतिशय योग्य केला आहे. अनेक नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. दादांनी हे जाणीवपूर्वक करणे आवश्यक होते. त्यांनी काही चुकीचे केलेले नाही, असे माझे मत आहे. छगन भुजबळ यांचा काहीतरी गैरसमज होत असेल तर त्यांनी तो दूर करावा, असे त्यांनी म्हटले.
भुजबळांनी पंतप्रधान व्हावं असं मला वाटतं
भुजबळांना शह देण्यासाठी तुम्हाला मंत्रीपद देण्यात आले, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, दादांचा वादा पक्का आहे. अनेक वेळा मी मुलाखतीत सांगितलं की, ते कमिटेड पॉलिटिशन आहेत. एखादी गोष्ट करताना दादा मागेपुढे बघत नाही. आमचे सिन्नरकर दादांवर प्रचंड खुश आहेत. मी दादांना सांगितले होते की, तुम्ही सिन्नरमधून उभे रहा, ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मी सिन्नरची जागा रिक्त करून देईल. छगन भुजबळ यांना कोणी वादा केला होता? कुठे पळून चालले, अजून राज्यसभा आहे, आत्ताशी सरकार स्थापन होऊन चार दिवस झाले. जरासा दम काढला पाहिजे, भुजबळांनी पंतप्रधान व्हावं असं मला वाटतं. मात्र, मला जे वाटतं ते जगात होईल, असे नाही. आम्ही वाट बघितली, आम्ही काही बोललो नाही. ज्यावेळी पक्ष वेगळा झाला, त्यांना मंत्रिपद मिळालं, आम्ही नाराज होतो का? त्यामुळे बाकी कोणी नाराज होण्याचे कारण नाही. बदल होणे हा निसर्गाचा नियम आहे, असे त्यांनी म्हटले.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर माणिकराव कोकाटेंचा दावा
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षातून पालकमंत्रीपदावर दावा केला जात आहे. याबाबत विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, आमच्या पक्षाचा दावा आहेच. कारण नाशिक जिल्ह्यात आमचे सात आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचे पाच आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. जिल्यातील 15 जागांपैकी 14 जागांवर महायुती आमदार विजयी झाले आहेत. 14 पैकी सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने येथील पालकमंत्रीपद आमच्या पक्षाला मिळावे, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.