टीम इंडियाचा पुढचा अश्विन कोण? उत्तर मिळालं; मुंबईचा 26 वर्षीय ऑफ स्पिनर भारतीय संघात
मुंबई : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन ब्रिस्बेन कसोटीनंतर निवृत्त झाला. अनिल कुंबळे, हरभजन सिंगनंतर भारतीय फिरकी गोलंदाजीची धुरा गेली १४ वर्ष अश्विननं यशस्वीपणे सांभाळली. कुंबळे आणि भज्जीचा वारसा पुढे नेला. पण अश्विनच्या निवृत्तीनंतर आता कोण? हा प्रश्न अनेकांना पडला होता. देशांतर्गत क्रिकेट आणि खासकरुन मुंबईचे सामने पाहणाऱ्या क्रिकेटरसिकांना याचं उत्तर काय असेल याची जाणीव आधीच होती. बॉर्डर-गावस्कर मालिकेतल्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियात जेव्हा अश्विनऐवजी एका मुंबईकर खेळाडूची निवड झाली तेव्हा क्रिकेटरसिकांचा तो अंदाज खरा ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न आणि सिडनीतल्या कसोटीसाठी अश्विनच्या जागी रोहित शर्माच्या भारतीय संघात निवड समितीनं संधी दिली ती मुंबईच्या तनुष कोटियनला.
कोण आहे तनुष कोटियन?
तनुष कोटियन. २६ वर्षांचा तनुष सध्याच्या मुंबई संघाचा अविभाज्य भाग. रणजी असो किंवा मर्यादित षटकांचे सामने कोणत्याही फॉरमॅटमध्ये मॅचविनिंग कामगिरी करणारा मुंबईचा हुकमी एक्का अशी तनुषची ओळख बनली आहे. २०२३-२४ च्या मोसमात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईनं सात आठ वर्षांचा रणजी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्या अख्ख्या मोसमात केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही चमक दाखवून तनुषनं रणजी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर मुंबईनं इराणी करंडक आणि नुकतीच सय्यद मुश्ताक अली स्पर्धा जिंकली. संघाच्या या यशातही तनुषची फिरकी प्रभावी ठरली. कामगिरीतलं कमालीचं सातत्य, मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देण्याची क्षमता आणि तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन केलेल्या ‘मॅचविनिंग’ खेळी यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघातही तनुषची निवड झाली होती.
तनुषचं डोमेस्टिक रेकॉर्ड
तनुष कोटियननं मुंबईकडून खेळताना प्रथम दर्जाच्या ३३ सामन्यांमध्ये २५.७०च्या सरासरीनं १०१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं या कालावधीत दोन शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. तनुषची याच कामगिरीनं त्याला आता टीम इंडियाच्या सिनियर टीमची दारं खुली झाली आहेत. अश्विन निवृत्त झाल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या ऑफ स्पिन गोलंदाजांची बीसीसीआयनं चाचपणी केली. पण बीसीसीआयनं तनुषवर विश्वास टाकत टीम इंडियात स्थान दिलं.
विक्रोळीचा तनुष टीम इंडियात
तनुष मूळचा मुंबईच्या विक्रोळीचा. वडील कमलाकर कोटियन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच. क्लब क्रिकेट, एज ग्रुप क्रिकेट ते रणजी करंडक अशी एकेक पायरी चढत तनुष आज भारतीय संघात दाखल झाला आहे. एमसीएच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन या क्लबचं तनुष प्रतिनिधित्व करतो. कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये पाच वर्षांपूर्वी रुट मोबाईल संघाकडून तनुषला संधी मिळाली. त्यानंतर गेली काही वर्ष तो इनकम टॅक्स संघाकडून टाईम्स शील्ड सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये खेळतोय.
संधी मिळाली, आव्हान मोठं
२०१० साली रवीचंद्रन अश्विन टीम इंडियात दाखल झाला तेव्हा तो २४ वर्षांचा होता. तनुषही फक्त २६ वर्षांचा आहे. संधी मोठी आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचं दडपणही तितकच असेल. पण तनुष मुंबईकर आहे. आणि क्रिकेटच्या मैदानात मुंबईकर खेळाडू हा खडूस मानला जातो. त्यामुळे आता तनुषला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा खडूसपणा सिद्ध करावा लागेल. मेलबर्न, सिडनी वाट पाहतंय…
अधिक पाहा..
Comments are closed.