परळीत 109 मृतदेह सापडलेत, पोलीस यंत्रणेवर वाल्मिक कराडांचा कंट्रोल, अंजली दमानिया संतापल्या..
संतोष देशमुख प्रकरण: बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडांवर कठोर कारवाईची मागणी होत असताना या प्रकरणात महत्वाचे खुलासे करणाऱ्या अंजली दमानिया यांनी परळीत एका वर्षात 109 मृतदेह सापडल्याचं सांगत यातील 106 प्रकरणांची साधी नीट चौकशीही होत नसल्याचं सांगितलं. परळीत सध्या मोठी दहशत असून इथल्या पोलीस यंत्रणेवर इथल्या आमदारांचा आणि वाल्मीक कराडांचा कंट्रोल आहे. हा कंट्रोल सुटण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या. परळी म्हणजे बिहारचा बाप झाला असून लाडकी बहीण योजनेत वाल्मीक कराडांना अध्यक्ष बनवण्याची शिफारस खुद्द मंत्री धनंजय मुंडेंनी केल्याचं कळणं याशिवाय धक्कादायक काहीच नसल्याचंही त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
परळीत मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, मागील एक वर्षात 109 मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या परळीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह सापडत असल्याने जिल्ह्याची स्थिती किती गंभीर असेल याची कल्पना करता येते. यापैकी फक्त तिघांच्या प्रकरणांची चौकशी व्यवस्थित होत असल्याचे दिसते, तर उर्वरित 106 प्रकरणांत चौकशी योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप आहे.अंजली दमानिया यांनी सांगितले की, “पोलीस यंत्रणेवर तिथल्या आमदारांचा आणि वाल्मीक कराड यांचा मोठा प्रभाव आहे, जो काढून टाकला पाहिजे. त्यामुळेच मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.”
लाडकी बहीण योजनेत वाल्मीक कराड अध्यक्ष शिफारस
परळीत सध्या बिहारपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली असून, लोक पुरावे, व्हिडिओ, फोटो देण्यास तयार आहेत. मात्र, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्याची विनंती करत आहेत. वाल्मीक कराड यांच्यावर 22 गंभीर आणि इतर 23 असे एकूण 45 गुन्हे दाखल आहेत.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराड यांची शिफारस केल्याची माहिती समोर आल्यावर अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. “धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या दोघांची कामे एका व्यक्तीप्रमाणे होत आहेत. म्हणूनच वाल्मीक कराड यांची चौकशी योग्य रीतीने व्हावी यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा:
वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंनी नोटीसच दाखवली; आता अर्थमंत्र्यांना भेटणार
अधिक पाहा..
Comments are closed.