पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावलेंचे समर्थक आक्रमक, 32 जणांनी तडकाफडकी दिले राजीनामे

भरत गोगावले: रागयडचे पालकमंत्रीपद मंत्री भरत गोगावले यांना मिळालं नसल्यानं त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. गोगावले यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सामुदायिक राजीनामे दिले आहेत. दक्षिण रायगडमधील 32 कार्यकर्त्यांनी  तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. त्यामुळं पालकमंत्रीपदाचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे.

जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांचाही राजीनामा

भरत  गोगावलेंच्या मदतीला कार्यकर्ते एकवटले आहेत. अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळं शिवसैनिकांमध्ये असंतोष असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  भरत गोगावले यांच्या शिवनेरी बंगल्यावर शिवसैनिकांची बैठक झाली. या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी  त्वरीत राजीनामे दिले आहेत. शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखासह तालुका प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा संघटक यांनीही सामुहिक राजीनामा दिला आहे. जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी  सुध्दा राजीनामा दिला आहे .

व्यवस्थित समतोल राखून एकमेकांना सहकार्य करु

याबाबत मंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना विचारण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, महायुतीच्या कोणत्याच सहकार्याने नाराज होण्याचं कारण नाही. पालकमंत्री पदाची जबाबदारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी दिली आहे. भरतशेठ माझे सहकारी मंत्री आहेत. मी पालकमंत्री असले तरी भरतशेठ देखील मंत्री असल्याने व्यवस्थित समतोल राखून एकमेकांना सहकार्य करु असे अदिती तटकरे म्हणाल्या. जिल्हा पुढे नेण्यासाठी आम्ही काम करु असेही त्या म्हणाल्या. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी राहणे स्वाभाविक आहे. मी जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या. साई बाबांच्या भूमीत शांती आणि सबुरीचा विचार आहे. चिंतन शिबिराच्या निमित्ताने साईबाबांचा हाच विचार घेऊन राष्ट्रवादी पुढे जाईल असेही तटकरे म्हणाल्या.

भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे केलं आवाहन

कार्यकर्त्यांच्या संतापानंतर भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे. तुमची नाराजी आणि संताप मला समजत आहे.  भरत शेठ हा तुमचा शेठ आहे, मी इतर कोणाचा शेठ नाही असे ते म्हणाले. माझ्यासाठी तुम्ही घेत असलेला निर्णय कुठे चुकीचा न होता त्याला कोणत्याही स्वरूपात गालबोट लागू नये. माझी वरिष्ठ मंडळींसोबत चर्चा सूरु आहे असे गोगावले म्हणाले. पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून एवढी काळजी करु नका. तुमचे माझावर अनंत उपकार आहेत आणि ते मी विसरणार नाही असे गोगावले म्हणाले. आपण नाराजी व्यक्त करू शकता. परंतु प्रशासनाला काही त्रास होईल असे वागू नका, अशा स्वरूपात गोगावले यांनी कार्यकर्त्यांना समज दिली.

अधिक पाहा..

Comments are closed.