दिल्लीत भाजपची मुसंडी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभवाच्या छायेत, राजधानीत सत्तापालट?

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होत आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. आज सकाळी आठ वाजता पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी सुरु करण्यात आली. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दिल्लीत प्रत्येक क्षणाला आम आदमी पक्ष (AAP) आणि भाजपमध्ये (BJP) चुरस दिसत आहे. क्षणाक्षणाला मतमोजणीचे चित्र पालटत आहे. सुरुवीताच्या टप्प्यात भाजपने बहुमताचा आकडा ओलांडून तब्बल 45 जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, मतमोजणीच्या (Delhi Election Results 2025) दोन तासांनी हे चित्र पालटायला सुरुवात झाली आहे. मात्र, क्षणाक्षणाला मतमोजणीचे कल बदलत असल्याने अद्याप निश्चित चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

मात्र, या सगळ्यात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. कारण, ‘आप’चे प्रमुख उमेदवार पिछाडीवर आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या संदीप दीक्षितही पिछाडीवर आहेत.  तर कालकाजी मतदारसंघात ‘आप’चा प्रमुख चेहरा असलेल्या आतिशी या पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे आक्रमक नेते रमेश बिधुडी आघाडीवर आहेत. तर जंगपुरा मतदारसंघात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे तरविंदर सिंह मारवा आघाडीवर आहेत.

आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पोस्टल मते आणि ईव्हीएम यंत्रांमधील मतांच्या मोजणीत भाजपचे वरचष्मा राखला आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अरविंद केजरीवाल, आतिशी, मनिष सिसोदिया यांनी एकदाही आघाडी घेतलेली नाही. हा ‘आप’साठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतिशी आणि मनिष सिसोदिया यांच्यासारखे राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय असलेले चेहरेही पराभवाच्या छायेत दिसत आहेत. मतमोजणीच्या सध्याच्या कलानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांपैकी भाजप 49, आप 19 आणि काँग्रेस पक्ष दोन जागांवर आघाडीवर आहे. विशेष बाब म्हणजे दिल्लीतील अनेक मुस्लीमबहुल भागांमध्येही भाजपने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत भाजपला विजय मिळाल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कैकपटींनी वाढणार आहे.

आणखी वाचा

Delhi Election Result 2025 Live: दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात, निकालाचे प्राथमिक कल समोर, भाजप आणि आपमध्ये कोणाची सरशी?

अधिक पाहा..

Comments are closed.