धक्कादायक! वाळूमाफियांवर कारवाई करण्याऐवजी तहसीलदारांना 3 तास ठेवले बसवून, त्यांचीच गाडी जप्त..
छत्रपती संभाजिनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधले जात असतानाच दुसरीकडे वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांनाच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी वाळूमाफियांविरोधात भूमिका घेण्याऐवजी 100-150 वाळूमाफियांना पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांनी तहसिलदारांची तक्रार लिहून न घेताच त्यांना 3 तास बसवून ठेवले आणि त्यांचीच गाडी जप्त केली. तहसीलदारांची गाडी जप्त करण्याचा पहिलाच प्रकार महाराष्ट्रात घडल्याचा असावा. या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलिस आयुक्तांना कारवाईच्या सूचना केल्या आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
या धक्कादायक घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांची मनमानी समोर आली असून वाळूमाफियांना अभय देण्यासाठी पोलिसांची मजल तहसिलदाराला शिवीगाळ करत वाहन जप्त करण्यापर्यंत गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचेच गुन्हेगारीला पाठबळ असल्याचं बोललं जात आहे.
नेमके प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरचे तहसिलदार रमेश मुंडलोड, दि. 6 फेब्रुवारी रोजी रात्री 10. वा. शासकीय काम आणि काही राजशिष्टाचाराची कामे आवरून घराकडे जात होते. यावेळी गारखेडा परिसरातील विजय चौक या ठिकाणी एक रेतीने (वाळू) भरलेला हायवा आढळून आला. वाळू वाहतुकीबाबत वाहनचालकास रॉयल्टीबाबत विचारणा केली असता वाहनचालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. या गाडीच्या मालकाविषयी विचारणा केली असता त्यांनी पवार नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यांची गाडी आहे असे सांगितले. हे कळताच संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना बोलावून घेऊन तलाठी यांना गाडीमध्ये बसून ते वाहन जप्त करण्यास तहसील कार्यालयाचे आवारात घेऊन जात असताना पोलिस अधीक्षक कार्यालयाशेजारी रेती माफिया, पोलीस कर्मचारी पवार ,तसेच इतर सगळ्यांनी मिळून तहसिलदारांची गाडी थांबवली. तहसिलदार ऑफिसची गाडी ही थांबून अरेरावीच्या भाषेत बोलत होते. पवार नावाचा व्यक्ती जो स्वतःला पोलिस कर्मचारी आहे. असे म्हणतो, तो तहसिलदारांना शिवीगाळ करत होता. याचाबतची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग तहसिलदारांनी रेकॉर्ड केली आहे.
100-150 वाळू माफियांना जमा करून धमकावले
‘पवार यांनी अंदाजे 100ते 150 वाळूमाफियांना जमा करुन मला धमकावण्याचा प्रयत्न करुन माझ्याशी वाद घालत वाळूने भरलेला हायवा पळवून लावल्याचं तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले. हायवा पळवून लावल्यानंतर पवार नावाच्या पोलिस कर्मचाऱ्यानं सांगितले की, ‘मी पोलिस कर्मचारी असून मी सर्व पोलिस स्टेशनला काम केलेले आहे, माझ्याविरोधात कुठल्याही पोलिस स्टेशनला कारवाई होणार नाही व मला कोणी काही करु शकत नाही असे सांगितले. त्यामुळे पवार यांच्याविरुद्ध घटनेची तक्रार करण्यासाठी मी स्वतः व पथकातील कर्मचारी जिन्सी पोलिस स्टेशन येथे रात्री १०.३० ते ११ वाजेच्या दरम्यान गेलो असता तेथे माझ्या अगोदरच पवार पोलिस कर्मचारी व त्याचा मुलगा व त्यांच्यासोबतचे 100ते 150वाळूमाफिया माझ्या अगोदर पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित होते. असे तहसिलदारांनी सांगितले.
तहसिलदारांची गाडी जप्त करण्यापर्यंत मजल!
‘मी पोलिसस्टेशन जिन्सी येथे उपस्थित पोलिस उपनिरीक्षक यांना झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली, परंतु वाळू वाहतूक करणारे पवार हे पोलिस कर्मचारी असल्याने पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित अधिकारी यांनी माझी तक्रारीची नोंद करुन न घेता वाळूमाफिया पोलिस कर्मचारी यांचीच असल्याने त्यांना साथदेत उलट माझ्याच वाहनाची चावी काढून घेऊन मला पोलिस स्टेशन येथे बसवून ठेवले. रात्रीचे 1 वाजेपर्यंत पोलिस स्टेशन जिन्सी येथे माझी कुठलीही तक्रार पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदवून न घेतल्याने मी रात्री 1 वाजता लेखी स्वरूपात तक्रार देऊन मला कार्यालयाची गाडी परत देण्यासाठी विनंती केली असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. ‘तुमची गाडी अवैधरीत्या फिरत होती म्हणून आम्ही जप्त केली आहे. अशा प्रकारे उत्तर देऊन मला कार्यालयाची गाडी देण्यात आलेली नाही. मी पथकातील कर्मचारी यांच्या खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन येथून जमा झालेल्या 100 ते 150 वाळुमाफीयांच्या गराड्यातून सुटका करून घेऊन घरी गेलो. असे तहसिलदारांनी सांगितले.
हेही वाचा:
Nagpur Bird Flu: नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा धोका, पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात
अधिक पाहा..
Comments are closed.