दिल्लीत मतमोजणी सुरु असताना मोठा ट्विस्ट, बसपाच्या उमेदवाराने अचानक ‘आप’ला पाठिंबा दिला, नेमकं
दिल्ली निवडणुकीचा निकाल 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज शनिवारी (दि. 08) जाहीर होणार आहेत. दिल्लीत आप (AAP), भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) अशी तिरंगी लढत झाली आहे. निवडणूक निकालापूर्वी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांनी दिल्लीत विजयाचा दावा केला आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप आणि आपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दिल्लीत मतमोजणी सुरु असतानाच आता मोठा ट्विस्ट आल्याचे चित्र आहे. बसपाच्या उमेदवाराने अचानक ‘आप’ला पाठिंबा दिला आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलानुसार, भाजप 44, आम आदमी पक्ष 24 आणि काँग्रेस पक्ष 2 जागेवर आघाडीवर आहे. दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. तर आम आदमी पक्षाचे तीन बडे नेते पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. आतिशी मार्लेना, मनिष सिसोदिया आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर हे पिछाडीवर आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागलेले असतानाच आता बसपाच्या उमेदवाराने थेट आपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय.
सुंदर लोहिया यांचा आपच्या उमेदवाराला पाठिंबा; म्हणाले…
घोंडा विधानसभा मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार सुंदर लोहिया यांनी मतमोजणी सुरू असतानाही आप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, आम आदमी पार्टीचे उमेदवार गौरव शर्मा यांना माझा पाठिंबा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांवर चालणारा पक्ष असेल तर तो आम आदमी पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे दिल्लीत मतमोजणी सुरु असतानाच बसपाच्या उमेदवाराने ‘आप’ला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीत कुणाची सत्ता?
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले आहे. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले आहे. निवडणुकीत 60.92 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. अरविंद केजरीवाल हे विजयाची हॅट्ट्रिक करणार की भाजप 27 वर्षांनी दिल्लीमध्ये सत्तांतर करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.