परळीत भिशी चालवणाऱ्या महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास चालू असतानाच 14 महिन्यापूर्वी परळीत महादेव मुंडे यांचा खून झाल्याचे प्रकरण पुढे आले होते. याही प्रकरणात तपास करण्यासाठी बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (Beed Police) एक पथक स्थापन केले आहे. सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यापासून अंजली दमानिया आणि अनेक नेत्यांनी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या खुनाच्या तपासाची मागणी केली आहे.

महादेव मुंडे हे पिग्मी वसूल करायचे त्यासोबतच पैशाची भिशी चालवायचे. साधे राहणीमान आणि ज्यांच्याशी व्यवहार येईल तेवढ्याच लोकांशी संबंध ठेवायचे विशेष म्हणजे राजकीय अथवा इतर कोणत्याही व्यक्तीसोबत फारसा संबंध न ठेवणाऱ्या महादेव मुंडे यांचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. हा खून एकतर चोरीच्या उद्देशाने केला असावा, असा संशय कुटुंबियांना आहे. कारण गळ्यातील लॉकेट, पैसे आणि मोबाईलसह सगळ्या वस्तू गायब झाल्या होत्या.

अनेक चकरा मारूनही प्रकरणाचा तपास लागत नसल्याने मुंडे कुटुंबीयांनी सदरील प्रकरण एलसीबीला वर्ग करण्याची विनंती परळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पीआय सानप यांना केली. एवढेच नाही तर 16 डिसेंबर 2023 ला मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते. तीन महिने उलटूनही प्रकरणाचा कुठलाच तपास होत नसल्याचे दिसून आल्यावर मुंडे कुटुंबियांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

याचिका दाखल केल्यानंतर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण समोर येईपर्यंत साधारण आठ ते नऊ महिने या प्रकरणाची कुठलीही चर्चा झालेली नव्हती. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी प्रामुख्याने महादेव मुंडे यांच्या कुणाचे प्रकरण हे संशयास्पद असून त्याचा फेरतपास करण्याची मागणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना भेटून केली त्या दिवसानंतर महादेव मुंडे यांच्या खुणाच्या तपासाला वेग आला आहे.

महादेव मुंडे यांच्या खुनाच्या तपासासाठी बीडच्या एसपीने आता एक पथक स्थापन करून चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र तब्बल 14 महिने महादेव मुंडे यांचा खून कोणी केला याची मागणी कुटुंबीय करत असताना पोलिसांनी मात्र कोणतीच भूमिका घेतली नव्हती. म्हणूनच आता जर 14 महिन्यानंतर महादेव मुंडेचे मारेकरी पोलिसांना सापडणार नसतील तर मग न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.

महादेव मुंडे हत्याप्रकरणाचा घटनाक्रम

* 20 आक्टोबर 2023 च्या संध्याकाळी महादेव मुंडे यांनी 6 वाजता ट्युशनवरुन मुलांना घरी सोडले

* त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले. गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले. आझाद चौकात मित्राला भेटले

* आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वाजता आढळून आली.

* ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली

* याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुकसह आणखी काही कागदपत्रं होती

* ही मोटरसायकल सापडली. मात्र महादेव मुंडे कुठे होते हे माहिती नाही. या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही.

* दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.

* 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांना फोन आला

* हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. मात्र तो फोन स्विच ऑफ आला.

* त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली. मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले

* महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला  होता आणि गळा कापलेला होता

* त्याचबरोबर हातावर, गालावर, पाठीवर वार करण्यात आले होते

* महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मी  कलेक्शनचे साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते

* मृतदेहाचे शवविच्छेदन  करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आम्ही आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=-l0iff8m8jw

आणखी वाचा

मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय

अधिक पाहा..

Comments are closed.