पुण्यात मविआला लवकरच पडणार खिंडार? काँग्रेसच्या नेत्याला अजितदादा अन् शिंदेंच्या नेत्यांची ऑफर,

बातम्या ठेवा: राज्यात आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींची शक्यता आहे. एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा असताना दुसरीकडे पुण्यातील या बड्या नेत्यांना अजित पवारांसह शिंदे गटानं पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पुण्यातील दोन माजी आमदारांनी काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, पण या दोन्ही आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे आता ऑपरेशन टायगरला ब्रेक लावणार का अशा चर्चा सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर धंगेकरांनी ठेवलेल्या स्टेटसनंतर या चर्चा आणखी वाढल्या होत्या. त्यानंतर आता महादेव बाबर आणि रवींद्र धंगेकर हे दोन्ही नेते शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पण आता या बाबर आणि धंगेकर यांना राष्ट्रवादीकडून ऑफर मिळाल्याने दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का अशा चर्चा आहेत.

ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेत्यांना गळाला लावण्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु झाल्याचे चित्र पुण्यात दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, शिवसेनेचा प्रवेशाची चर्चा धंगेकर यांनी फेटाळून लावली आहे. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. धंगेकर यांच्या सारखा काम करणारा, सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याने, लोकप्रतिनिधीने नक्की एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती करते, असे रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

रुपाली पाटलांनी दिली धंगेकरांना ऑफर?

रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते, सक्षम लोकप्रतिनिधी आहात.  निवडणुकीत हार जीत चालतच असते. पण नेतृत्व, कामाची पद्धत थांबत नसते. भाऊ तुमच्या सोबत काम केले आहेच. काही दिवसांपासून बातमी येत आहे, दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहात.   कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहात, कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात. रवी भाऊ अजित दादांचे आणि तुमचे संबंध नेहमीच चांगले आहे, ते तुम्ही अनुभवले आहे. तुमच्यासारखा काम करणारा, सक्षम, सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याने, लोकप्रतिनिधीने नक्की एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती करते, बाकी पक्ष वेगळे असले तरी हाडाचे कार्यकर्ते, काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी बहीण भाऊ हे नाते कायम आहेच, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.