500 पोलिसांचा फौजफाटा, ग्रामस्थांची मदत अन् आरोपीला पकडण्यासाठी काय केलं; पुणे पोलिस आयुक्तांनी
पुणे: पुण्यातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्या दत्तात्रय रामदास गाडे याला काल (शुक्रवारी) रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. शिरूरमधील गुणाट या मुळगावी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची आणि डॉग स्कॉडची मदत घेतली होती. या प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे. या घटनेचा तपास विविध पथकांकडून सुरू होता. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवली जाणार आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. तपासासाठी एक विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
शहरात कायदा, सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काल एक ते दीड वाजता गुणाट गावातून आरोपीला अटक करण्यात आली, आरसीपी, पोलिस आणि स्कॉड त्याचा शोध घेत होते, जवळपास 500 पोलिस त्याचा शोध घेत होते. स्थानिकांनी आरोपीला पकडून देण्यात मोठी मदत केली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवली जाईल. यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती केली जाईल. या प्रकरणानंतर शहरातील डार्क स्पॉट्सची, बस स्थानकावरील, निर्जन स्थळावरील सुरक्षा वाढवण्यात येत आहे. महापालिकेशी बोलून डार्क स्पॉट परिसरात लाईट्स लावण्यात येतील. आरोपीला अटक करण्यात उशीर झाला. घटना घडल्यावर दोन – अडीच तासात आरोपीची ओळख पटली होती. त्यानंतर पोलीस पथक तिथे गेले. मात्र, सुरुवातीला आरोपी भेटला नाही. गुणाट गावातील स्थानिकांनी आरोपीला पकडण्यात खूप सहकार्य केले. त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो, पुणे पोलिसांतर्फे गुनाट गावात जाऊन गावकऱ्यांचे आभार मानण्यात येतील, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.
आरोपीला पकडण्यात सर्वांचं श्रेय आहे. काही पोलिस अधिकारी तीन दिवस घटनास्थळावरती तपास करत होते, काही अधिकारी 3 दिवस आरोपीच्या शोधासाठी काम करत होते. सुरवातीला आम्हाला तो गावात लपल्याचा संशय आला. त्यानंतर परिसरात शोध घेतला. डीसीपी झोन 2 चे अधिकारी, इतर पोलिसांच्या टीम आरोपीचा शोध घेत होते. स्थानिकांनी मोठी मदत केली. रात्री अंधार असल्याने त्याला शोधणं कठीण होते, काही अडथळे येत होते, पण त्याला अखेर पकडण्यात यश आलं आहे गावातून बाहेर जाण्याचे मार्ग देखील बंद करण्यात आले होते.
“एक विशेष पथक तपासासाठी तयार केलं आहे. पुरावे तयार केले जात आहेत. स्पेशल कौन्सिलची नियुक्ती होणार आहे. फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार. क्राइम बांचचे जे वेगवेगळे पथक स्वागर गेट पथक आणि झोन चू टे वनेगवेगळ पथकर असे मिळून अंदाजे 500 पोलीस कर्मचारी या ऑपरेशनमध्ये होते” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. तर महिलांच्या सुरक्षेविषयी एक आढावा घेतला. निर्जनस्थळी, एसटी स्टँड , रेल्वे स्थानक, डार्क स्पॉट, टेकडी स्पॉट, हॉटस्पॉटचे सेफ्टी ऑडिट सुरू आहे. पालिका आणि इतर विभागाशी मिळून डार्क स्पॉटच्या इथे दिवे लावणार आहे. मार्शलकडून निर्जनस्थळी क्यूआरकोड मॅपिंग केली जाणार आहे अशी माहिती अमितेश कुमार यांनी महिला सुरक्षेविषयी दिली आहे.
‘आरोपीला अटक करण्यात उशीर झाला आहे. तीन दिवस लागले’ अशी कबुली देखील पत्रकार परिषदेत अमितेश कुमार यांनी दिली. “पहिल्या दिवशी फिर्याद आल्यावर दीड ते दोन तासात वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या. 23 सीसीटीव्ही कॅमेरे एसटी स्टँडच्या आतील भागातील. 48 कॅमेरे बाहेरचे तपासले. दीड ते दोन तासाच आरोपीचं नाव निष्पन्न केलं. तांत्रिक पुरावा गोळा केला. त्यात आमचे पथक गुनाट गावात दोनच्या सुमारास पोहोचलं होतं. पूर्ण प्रयत्न करून आरोपी सापडला नाही. काल अखेर पकडला. गावातील नागरिकांनी सहकार्य केलं. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. मदत करणाऱ्या नागरिकांचं अभिनंदन करणार आहोत” असंही अमितेश कुमार म्हणाले आहेत.
एक लाखाची मदत मिळणार का?
ज्यांनी आरोपीची महत्त्वाची माहिती दिली. ज्याच्या माहितीनंतर आरोपीपर्यंत पकडण्यात यश आलं, त्यांना एक लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे, त्याव्यतिरिक्त गावासाठी आम्ही काय करू शकतो ते देखील आम्ही करू असंही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. गावातील ज्या व्यक्तीने दत्ता गाडेची माहिती दिली, त्या व्यक्तीला एक लाखांचे बक्षीस दिले जाईल.
ज्या गुन्हेगारांवर या आधी विनयभंग, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.आरोपी दत्तात्रय गाडेच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आढळले आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का हे तपासावे लागेल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.