तरुणी जीवाच्या भीतीने मेल्यागत पडून राहिली, नराधम दत्तात्रय गाडे अत्याचार करत राहिला

पुणे: पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीचा भाग असणार्‍या स्वारगेट एसटी आगारात गेल्या आठवड्यात एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार (Pune Rape Case) झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) शिरुर जिल्ह्यातील गुनाट गावात ऊसाच्या फडात शोधमोहीम राबवून नराधम दत्तात्रय गाडे याला अटक केली होती. पोलिसांच्या हातात सापडल्यानंतर दत्तात्रय गाडे (dattatray gade) उलट तरुणीवरच आरोप करताना दिसत आहे. मी तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी पैसे दिले होते, असा दावा दत्तात्रय गाडे याच्याकडून केला जात आहे. या सगळ्यात दत्तात्रय गाडे याच्या बायकोसह त्याचे कुटुंब त्याला साथ देत आहे. मात्र, या सगळ्या निर्लज्जपणाचे पितळ उघडे पाडणारी माहिती समोर आली आहे.

दत्तात्रय गाडे याने तरुणीने तिच्या मर्जीने आपल्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात ही तरुणी जीवाच्या भीतीने गप्प राहिली आणि तिने आरडाओरडा केला नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. अत्याचारावेळी दत्तात्रय गाडे याने आपल्याला जिवंत सोडावे, या एका कारणासाठी तरुणीने प्रतिकार केला नाही. दत्तात्रय गाडे हा आपण कंडक्टर असल्याचे सांगत शिवशाही बसमध्ये घेऊन गेला. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नसल्याचे पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दत्तात्रय गाडे याने तिला सीटवर ढकलून दिले. पिडीत तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, बसच्या काचा बंद असल्याने आवाज बाहेर आला नाही. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने पीडितेचा गळा दाबला. त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली. आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करु लागली. याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले.

या तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव वाचवायचा होता. पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडिता घाबरली आहे, ती फार प्रतिकार करत नाही, ही गोष्ट दत्तात्रय गाडे याच्या लक्षात आली. तेव्हा नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती. तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव, अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली. त्यामुळे दत्तात्रय गाडे याचे काम सोपे झाले.

दत्तात्रय गाडे याच्याकडून यापूर्वीही बलात्काराचा प्रयत्न

दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार होता. त्याचे कुटुंबीय गाडे याचा बचाव करत असले तरी त्याने यापूर्वीही एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र, संबंधित महिलेनेही घाबरुन हे प्रकरण फार पुढे नेले नाही. या पीडितेने दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध केवळ चोरीची तक्रार दिली होती. दत्तात्रय गाडे हा दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुण्यात शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी कबुली त्याने यापूर्वी पोलिसांना दिली आहे. यापूर्वी ही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, दत्तात्रय गाडे याच्या बायकोसह त्याचे कुटुंबीय त्याने काही केलेच नाही, अशाप्रकराची बतावणी करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=ZCF5K7IOEHE

आणखी वाचा

वकिलानंतर आता दत्ता गाडेच्या बायकोचाही मोठा दावा; म्हणाली, ‘बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली, मग…’

अधिक पाहा..

Comments are closed.