राजीनाम्याची चर्चा, धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, आजच निर्णय होणार?
मुंबई: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांमुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे नागरी व अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde) यांनी रविवारी धनंजय मुंडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजीनामा देतील. किंबहुना दोन दिवसांपूर्वीच अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचा राजीनामा घेऊन ठेवल्याचा दावा करुणा मुंडे यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधानपरिषदेचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, फडणवीसांची भेट घेतल्यामुळे धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असावा का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. विधान परिषदेचे कामकाज संपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत उभयतांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील कळू शकलेला नाही. एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी मुख्यमत्र्यांची भेट घेतल्याने भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना सलग बोलताना अडचण येत आहे. हेच आजारपणाचे कारण पुढे करत धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार का, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, याबाबत अद्याप धनंजय मुंडे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
करुणा शर्मा मु्ंडे यांनी रविवारी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. मी 5 मार्चपासून धनंजय मुंडे यांच्याविरोधात उपोषण करणार होते. पण मला सूत्रांनी माहिती दिली की, तुम्ही उपोषणाला बसू नका. दोन दिवस आधीच अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतला आहे. सोमवारी राजीनामा सादर होईल. धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते. पण अजित पवारांनी त्यांचा राजीनामा लिहून घेतला. सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा सगळ्यांसमोर सादर होईल, असे करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटले. ‘3-3-2025 को राजीनामा होगा’, अशी पोस्टही करुणा मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली होती.
आणखी वाचा
मोठी बातमी : धनंजय मुंडे Bell’s Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!
अधिक पाहा..
Comments are closed.