सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना हायकोर्टाचा दिलासा, FIR ला स्थगिती
मुंबई : मुंबई हायकोर्टानं मुंबई सत्र न्यायालयानं सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच ,बोर्डाचे काही सदस्य, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे काही मोठे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. गुन्हा नोंदवण्याच्या मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशाला चार आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे. बुच आणि इतर अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेत याचिका स्वीकारत बुच आणि इतर अधिकाऱ्यांवरील कारवाईला स्थगिती दिली.
मुंबई सत्र न्यायालयानं भांडवल बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. मुंबईतील विशेष न्यायालयानं हे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले होते.
सेबीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन रामामूर्ती, तत्कालीन अध्यक्ष व जनहित संचालक प्रमोद अग्रवाल तसेच सेबीचे तीन पूर्णवेळ सदस्य अश्वनी भाटिया, अनंत नारायण जी आणि कमलेश चंद्र वार्ष्णेय यांच्यावर कारवाई संदर्भात आदेश देण्यात आले होते. या सर्वांविरोधातील कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे.
अदानी समूहाच्या कथित आर्थिक घोटाळ्यातील परकीय निधीत बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची भागीदारी असल्याचा आरोप अमेरिकास्थित हिंडनबर्गने केला होता.त्यानंतर, सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष असलेल्या माधवी बुच या वादाच्या भोव-यात सापडल्या होत्या.
मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर यांनी पत्रकार सपन श्रीवास्तव यांच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं की, या प्रकरणी नियामकांचा बेजबाबदारपणा आणि सहभागाचे प्राथमि पुरावे आहेत, ज्याच्या पडताळणीसाठी निष्पक्ष चौकशीची गरज आहे.
सेबीनं या प्रकरणी भाष्य करताना म्हटलं होतं की, या आदेशाला आव्हान देण्यासाठी आवश्यक पावलं उचलणार आहोत. सेबीनं म्हटलं की या प्रकरणात ज्यांची नावं घेतली ते त्या काळात पदावर नव्हते. सेबीनं म्हटलं की न्यायालयानं कोणतीही नोटीस न देता, तथ्य रेकॉर्डवर घेण्याची संधी न देता याचिकेला मंजुरी दिली. सेबीनं याचिकाकर्त्यानं यापूर्वी देखील अशा याचिका केल्याचं म्हटलं होतं.
माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ वादात
माधबी पुरी बुच या सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख होत्या. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ 1 मार्चला संपला. माधबी पुरी बुच यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळात शेअर बाजारात तेजी, विदेशी गुंतवणूकदारांमध्ये वाढ, म्युच्युअल फंड छोट्या गुंतवणूकदारांपर्यंत घेऊन जाणं या सारख्या गोष्टी झाल्या. याशिवाय काही वादांना देखील त्यांना सामोरं जावं लागलं. माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. याशिवाय विदेशी गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचं दिसून आलं.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..
Comments are closed.