”एकतर भैय्याजी जोशी चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा”; मराठीवरुन ठाकरे कडाडले

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी (Marathi) भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ माजला आहे. मुंबईत विविध भाषा आणि प्रांताचे लोक राहतात. त्यामुळे, मुंबईत अनेक भाषा आहेत, मुंबईची एक भाषा नाही. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मुंबईत राहणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यानंतर, मराठी भाषेचा अवमान केल्यावरुन अधिवेशन सभागृहात देखील हा मुद्दा उपस्थित झाला. महाविकास आघाडीच्या विशेषत: ठाकरेंच्या शिवसेना आमदारांनी या मुद्द्यावरुन सरकारला प्रश्न केले. त्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर आहे हे मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर करावं किंवा भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उधव ठाकरे (उधव विचार करा) यांनी केली.

भैय्याजी जोशी यांनी काल विधान केलं आणि गोमूत्र म्हणायचं की काय ते शिंपडून गेले आहेत. आता, हिंदुस्तान पाकिस्तान विषय काढलेला नाही. मग बटेंगे तो कटेंगे आणि तिकडे मराठा-मराठेत्तर वाटणी करायची आणि राज्य करायचे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठीसंदर्भातील वक्तव्यावरुन तीव्र संताप व्यक्त केला. अनाजीपंतांनी तामिळनाडू आणि अहमदाबादमध्ये हे बोलून दाखवावं आणि परत येऊन दाखवावं, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. मराठी माणूस मतं देणारच आहे, जातंय कुठे असा प्रश्न त्यांना पडतोय का. भाषावार प्रांतरचना झाली आता गल्लीवार प्रांत रचना करत आहे का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. शिवरायांबद्दल अवमानग्रस्त बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस असल्याचं म्हटलं. मग, आता भैय्याची जोशी चिल्लर माणूस आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करुन दाखवावं नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली आहे. मराठी भाषा आली नाही तरी चालेल म्हणणाऱ्यावर कारवाई करुन दाखवावी. नाहीतर मान्य करावं भाजप आणि संघाचा हा छुपा अजेंडा आहे, अशा शब्दात ठाकरे कडाडल्याचं पाहायला मिळालं.

लोकमान्य टिळकांचा दिला संदर्भ

राज्य सरकारला विचारतोय तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण लोकमान्य टिळक यांनी त्यावेळी ब्रिटीश सरकारला प्रश्न विचारला होता, अग्रलेख लिहिला होता. तो मराठीतच लिहिला होता, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असं त्यांनी मराठीतच म्हटलं होतं याची आठवण देखील उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

काय म्हणाले होते भैय्याजी जोशी

मुंबईच्या विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईच्या विविधतेतील एकतेवर भाष्य केलं. मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले होते. त्यानंतर, आता त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सभागृहात या वक्तव्यावरुन गदारोळ माजल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी देखील याच मुद्द्यावरुन फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा

Video: शिक्षणमंत्र्यांवर भडकले नाथाभाऊ; शाळा अन् संस्थाचालकांच्या प्रश्नावरुन तारांकीत प्रश्न, म्हणाले, इमारती विकून टाका

अधिक पाहा..

Comments are closed.