बीडमधील 26 पोलीस वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा आरोप; पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर तृप्ती द

देसाई: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराडला (Walmik Karad) मुख्य आरोपी करण्यात आले आहे. देशमुखांच्या हत्येनंतर बीड पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वाल्मिक कराडच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची यादीच जाहीर केली होती. आता बीड पोलिसांनी तृप्ती देसाई यांनी नोटीस धाडली आहे.

तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी देताना ते वाल्मिक कराडच्या खास मर्जीतले असल्याचे म्हटले होते. जानेवारी महिन्यात त्यांनी ही यादी प्रसिद्ध केली होती. आता याबाबत बीडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयाने दखल घेतली आहे. तृप्ती देसाईंना आता चौकशीसाठी बोलवण्यात आले असून 17 तारखेला त्यांना बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘त्या’ पोलिसांना बीड बाहेर घालवण्याची वेळ : तृप्ती देसाई

याबाबत तृप्ती देसाई म्हणाल्या की,  बीड जिल्ह्याचा गुंडाराज रोखायचा असेल तर या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बीडबाहेर घालवण्याची वेळ आली आहे.  वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मी जाहीर केली होती. याबाबत गृहमंत्रालय आणि पोलीस अधीक्षक बीड यांना देखील तक्रार दिली होती. जे आरोप मी केले होते, त्या संदर्भातले पुरावे घेऊन येण्यासाठी मला बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.  या नोटीसला उत्तर देण्यासाठी सगळे पुरावे घेऊन मी 17 मार्च रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहणार आहे, असे त्यांनी म्हटले.

दोषींचे निलंबन होणे गरजेचे : तृप्ती देसाई

तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, बीडमध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीनुसार अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनमध्ये वर्षानुवर्ष काम करतात.  अनेक गुन्हेगारांना त्यांनी पाठीशी घातले आहे.  माझ्याकडे या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अनेक पुरावे ऑडिओ, व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. हे सर्व पुरावे घेऊन मी बीडला जाणार आहे. गृहमंत्री आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की, तुम्हाला जे पुरावे हवे आहेत ते पुरावे देते.पण, जे दोषी आहेत त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर काढा. जे दोषी आहेत त्यांचं निलंबन होणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=GCCPV2IMVYU

आणखी वाचा

Walmik Karad: संतोष देशमुख प्रकरणी सुनावणी; आरोपी व्हीसीद्वारे न्यायालयात उपस्थित, वाल्मिक कराड हात जोडून…

अधिक पाहा..

Comments are closed.