पुढचे काही दिवस शांत राहा! नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून नितेश राणेंना तंबी

मुंबई: औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आक्रमक हिंदुत्त्वाचे नवे आयकॉन आणि चेहरा होऊ पाहत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.  देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर नितेश राणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले.

फक्त, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर नितेश राणे त्यांच्या नेहमीच्या आवेशात दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का, असा प्रश्न विचारल्यानंतर नितेश राणे यांचा पारा काहीसा चढला. मी माझ्या मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. मुख्यमंत्री माझा हात हातात घेऊन हसले. तुम्ही तुमच्या बातम्या चालवा. मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे. माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतात, याची चिंता तुम्ही करु नका. मी तुमच्या घरात डोकावतो का? मी इतर मंत्र्यांसारखा नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

यावेळी नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भाषा वापरत नागपूर हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले. दंगलखोरांना त्यांचा ‘पाकिस्तानातील अब्बा’ आठवेल, अशी टिप्पणी नितेश राणे यांनी केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूर हिंसाचाराबाबतची माहिती सभागृहात दिली आहे. नागपूर हिंसाचारात काही गोष्टी ठरवून करण्यात आल्या. ही दंगल पूर्वनियोजित होती का, याची चौकशी केली जाईल. राज्यात आता पूर्वीसारखं काही घडवणं सोपं राहिलेलं नाही. पोलीस त्याठिकाणी आंदोलकांना शांत बसवण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हे आंदोलन कुठल्या चौकटीत बसते? असा प्रकार घडल्यानंतर आमचं देवाभाऊंचं सरकार गप्प बसेल, असे तुम्हाला वाटते का? संबंधितांना त्यांचा ‘पाकिस्तानातील अब्बा’ आठवेल, अशी कारवाई केली जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. प्रत्येकाला आंदोलनाचा हक्का आहे. पण हे कोणतं आंदोलन? एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. ही हिंमत तोडण्याचं काम देवाभाऊंचं सरकार करेल, असे नितेश राणे यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=iykgtzrr354

आणखी वाचा

त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!

अधिक पाहा..

Comments are closed.