गुन्हेगारांसोबत फोटो व्हिडीओवरून पक्षाच्या अध्यक्षांची तंबी; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंना गुंडाशी जवळीक राखणं चांगलंच भोवलं. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. त्यानंतर अजित पवारांनी पक्षातील सर्व नेत्यांना तंबी देत फोटो व्हिडीओ काढताना काळजी घ्या असं म्हटलं होतं. याची जाणीव असताना ही अनेक नेते गुन्हेगारांचं उदात्तीकरण जाणीवपूर्वक करतात आणि मग ते अडचणीत ही येतात. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) ही अशाच एका गुन्हेगारामुळं चर्चेत आले आहेत. निमित्त बनसोडेंच्या वाढदिवसाचं होतं. गुंड आकाश उर्फ आक्या बॉण्ड उर्फ सुमित मोहोळ थेट बनसोडेंना केक भरवतानाचा आणि सोबत बनसोडे पुत्र सिद्धार्थ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात उतरलेल्या आक्या बॉण्डला बनसोडेंनी स्वतःच्या बर्थडे निमित्त केक भरवला. हे पाहून बनसोडे गुन्हेगारांचं उदात्तीकरण तर करत नाहीत ना? अशी चर्चा सध्या परिसरात रंगलेली आहे. एबीपी माझाने अण्णा बनसोडेंची (Anna Bansode) याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा वारंवार प्रयत्न करतंय, मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं त्यांची बाजू अद्याप समजू शकलेली नाही. परंतु अशा घटनांना थारा न देणारे अजित पवार आता बनसोडेंची कानउघाडणी करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सोशल मीडियावर पोस्ट

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना नेहमीचं डावलत आले. बनसोडेंनी मात्र अजित दादा मला मंत्री करणार असा अट्टाहास लावून धरला. सरतेशेवटी अजित दादांनी बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावली. पण या पदाची जबाबदारी सोपवताना अजित दादांनी बनसोडेंना उपाध्यक्ष पदाची गरिमा राखण्याचा सल्ला नक्कीच दिला असणार. बनसोडेंनी सुद्धा या पदाला साजेसं आणि राज्याच्या हिताचं काम करेन असं अनेकदा सांगितलं. अशातच विधानसभा उपाध्यक्षपदी बसल्यानंतर बनसोडेंचा पहिला वाढदिवस साजरा होत होता. त्याचवेळी गुंड आक्या बॉण्डची एन्ट्री झाली. साहेब असा उल्लेख असलेला केक आणि बुके घेऊन तो आला. आक्याबॉण्डच्या उजव्या बाजूला बनसोडे आणि डाव्या बाजूला पुत्र सिद्धार्थ उभे राहिले. मग उपाध्यक्ष बनसोडेंनी केक कापला. बनसोडे आणि आक्याबॉण्डने एकमेकांना केक ही भरवला, याची रील सोशल मीडियावर ही पोस्ट करण्यात आली आणि ही बाब उजेडात आली.

त्याच्यावर 16 गुन्हे दाखल

बनसोडे पुत्र सिध्दार्थच्या पेजवर सुद्धा ही रील होती, नंतर मात्र ही रील डिलीट करण्यात आल्याचं ही बोललं जात आहे. आक्या बॉण्डने अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकलं आहे, आजवर त्याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे पाहता बनसोडेंनी त्याच्यासोबत स्वतःचा बर्थडे कसा काय साजरा केला? एकवेळ बनसोडेंना याची कल्पना नाही, असं गृहीत धरलं तर मुलगा सिद्धार्थला हे नक्कीच ठाऊक असणार? मग त्याने आक्या बॉण्डला का रोखलं नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे.

बनसोडे आधीही आलेले अडचणीत

बनसोडे पुत्र सिद्धार्थमुळं या आधी ते अडचणीत आलेले आहेत. एका ठेकेदाराच्या मॅनेजरला मारहाण प्रकरणी सिद्धार्थने जेलची हवा खाल्ली होती. त्यावेळी अजित दादांनी बनसोडेंना शेलक्या शब्दात सुनावलं सुद्धा होतं. त्यानंतर आता आक्या बॉण्डमुळं ही बनसोडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. बनसोडे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करतायेत का? अशी चर्चा रंगलेली आहे. याबद्दल बनसोडेंची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. परंतु अशा घटनांना थारा न देणारे अजितदादा आता बनसोडेंची कानउघाडणी करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अधिक पाहा..

Comments are closed.