आयुषचा वर्ल्ड नंबर Infosys वनला दणका, चीनच्या शी यू चीवर विजय; सिंधू, त्रिसा-गायत्री, हरिहरन-अर्जुनही विजयी
हिंदुस्थानचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वर्ल्ड नंबर वन आणि जगज्जेता चीनच्या शी यू चीला धूळ चारत खळबळ उडवून दिली, तर स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधूनेही दणक्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. २२व्या मानांकित आयुषने शी यू चीचा २१-१४, १३-२१. २१-१९ असा पराभव केला. सिंधूने आयर्लंडच्या सोफिया नोबेलला अवघ्या २९ मिनिटांत २१-७. २१-११ असे नमवले.
आयुष शेट्टीची कमाल
आयुषने पहिल्याच गेममध्ये आक्रमक खेळ करत २१-१४ अशी आघाडी घेतली. शी यू चीने दुसऱ्या गेममध्ये २१-१३ असा विजय मिळवत सामन्यात पुनरागमन केले. मात्र निर्णायक गेममध्ये आयुषने संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मेळ साधत २१-१९ असा विजय मिळवला आणि जगज्जेत्याला पहिल्याच फेरीत बाहेरचा रस्ता दाखवला. आयुषने २०२३च्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिकले होते. २०२५च्या यूएस ओपनमध्ये पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद मिळवले, या पार्श्वभूमीवर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूवर मिळवलेला विजय त्याच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरला आहे.
दुहेरीतही हिंदुस्थानचा झेंडा
महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या पाउला लोपेझ आणि लुसिया रोड्रिगेज यांचा २१-९, २१-१३ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत हरिहरन अम्साकरुणन आणि एम. आर. अर्जुन यांनीही आगेकूच केली. स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांनी सामना सोडल्यामुळे भारतीय जोडीला पुढील फेरीचे तिकीट मिळाले.
सिंधूचा दणक्यात विजयारंभ
दोन ऑलिम्पिक पदकांची मानकरी पी. व्ही. सिंधूने आयर्लंडच्या सोफिया नोबेलला २१-७, २१-११ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये ११-३ अशी आघाडी घेतल्यानंतर सिंधूने प्रतिस्पर्धीला सावरण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या गेममध्येही नियंत्रण कायम ठेवत तिने सामना खिशात घातला. सिंधूने आतापर्यंत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य, दोन रौप्य आणि २०१९ मधील सुवर्ण अशी पाच पदके जिंकली आहेत. उपांत्य फेरी गाठल्यास तिचे पदक निश्चित होणार असून, सहावे पदक जिंकताच ती या स्पर्धेत सहा पदके मिळवणारी पहिली खेळाडू ठरणार आहे. दुसऱ्या फेरीत तिच्यासमोर कॅनडाची वेन यू झांग हिचे आव्हान असेल.
Comments are closed.