बक्षीस म्हणून सिगारेटचे पाकीट

मित्रांमधील भांडणाचे पर्यवसान कशात होऊ शकते, हे दर्शविणारी एक घटना उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे घडली आहे. येथे वास्तव्यास असणाऱ्या तीन मित्रांची एका मित्राशी एकदा मोठी वादावादी झाली. त्यानंतर या मित्राने आपल्या इतर तीन मित्रांशी अबोला धरला. अनेक महिने त्याने त्यांची साधी भेटही टाळली. मोबाईलवर किंवा व्हॉटस्अपवरही संवाद टाळला. त्यामुळे या तीन मित्रांनी त्याची समजूत काढण्यासाठी आणि त्याला आपल्याशी बोलायला भाग पाडण्यासाठी एक वेगळीच शक्क्ल लढविली. त्यांनी तो बेपत्ता झाल्याची पत्रके त्याच्या छायाचित्रांसह मुद्रीत करुन घेतली आणि ती शहरात अनेक सार्वजनिक स्थानांवर सर्वांना दिसतील अशी चिकटविली. ही पत्रके या अबोला धरलेल्या मित्राच्या कुटुंबियांच्या दृष्टीस पडली. आपल्या कुटुंबातील युवक, बेपत्ता झाल्याचे पत्रक पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मुळात अशी घटना घडलीच नव्हती. यांना हा प्रकार धोकादायक वाटला. कारण जो युवक त्यांच्या घरी होता आणि जो कोठेही बेपत्ता झाला नव्हता, त्याची अशी पत्रके पाहून चिंता वाटणे स्वाभाविकच होते.

त्यांनी या युवकाला या पत्रकांसंबंधी माहिती दिली आणि सर्वांनी मिळून पोलिसांच्याकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. पोलिसानी या युवकाची प्राथमिक चौकशी केली, तेव्हा त्यांना या युवकाचे काही महिन्यांपूर्वी तीन मित्रांशी कडाक्याचे भांडण झाल्याचे समजले. चिकटविण्यात आलेल्या पत्रकांवर ती कोणी चिकटविली आहेत, त्यांची नावे नव्हती. तथापि, ती याच मित्रांनी त्याला त्रास देण्यासाठी चिकटविली असावीत, हे हेरुन पोलिसांनी या तीन मित्रांना शोधून काढले आणि त्यांची कसून चौकशी केली तेव्हा खरा प्रकार बाहेर पडला. ‘छायाचित्रातील युवक हरविला असून त्याला शोधून देणाऱ्यास सिगरेटचे पाकीट बक्षिस देण्यात येईल,’ असा मजकूरही या पत्रकांवर होता. हे आपण चेष्टेत केला आहे. मित्र आपल्याकडे परत येईल, अशा समजुतीपोटी आम्ही हे केले, या या मित्रांनी पोलिसांकडे स्पष्ट केले. तथापि, हे बेकायदेशीर असून त्यासाठी शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी त्यांना समजावले त्यांनी कानउघाडणी करुन प्रकरणावर पडदा टाकला असला तरी चेष्टाही एका मर्यादेत केली पाहिजे हा धडा या घटनेवरुन सर्वांना मिळाला आहे.

Comments are closed.