दुर्गापूजेच्या नावाखाली 50-60 कोटी रुपयांचा घोटाळा.
तृणमूल नेत्याच्या ठिकाणांवर ईडीचे छापे
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या तयारीदरम्यान कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचे वृत्त समोर आले आहे. राज्याची राजधानी कोलकाता येथे मंगळवारी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या पथकाने पूजेच्या नावावर घोटाळा केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी छापा टाकला आहे. ईडीला सेन यांच्या घरातून काही पुरावे हाती लागल्याचे समजते. ईडीच्या पथकाने कोलकात्यातील सेन यांचे हायलँड पार्क येथील घर, हिंदुस्थान पार्क तसेच त्यांचे नातेवाईक आणि इतर ठिकाणांसमवेत एकूण 10 ठिकाणी छापे टाकले. इंद्रनील सेन यांनी ‘मास आर्ट“ नावाच्या एका संस्थेद्वारे दुर्गा पूजेच्या नावावर मोठी रक्कम जमविली आणि मग त्या रकमेत घोटाळा केल्याचा आरोप आहे.गायक राहिलेले इंद्रनील सेन आणि त्यांची पत्नी मधुछंदा सेन यांनी मिळून ‘मास आर्ट“ नावाची संस्था स्थापन केली होती. 2022 मध्ये महानिर्वाण रोड मास आर्ट सोसायटीच्या नावाने याची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेने युनेस्कोच्या नाव अन् लोगोचा वापर करत स्वत:ला युनेस्कोचा अधिकृत पार्टनर ठरवत प्रचार केला. यानंतर संस्थेने कोलकात्यातील 24 दुर्गा पूजा मंडपांचे ‘प्रीह्यू शो“ दाखविण्याच्या नावावर महाग किमतीत तिकीटांची विक्री केली होती. आता संस्थेवर युनेस्कोच्या नावाचा दुरुपयोग करणे आणि दुर्गा पूजेच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.
Comments are closed.