'दहशतवाद' हा मतभेदाचा मुख्य विषय आहे.

अमेरिकेशी संबंधांसंबंधी जयशंकर यांचे प्रतिपादन

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पाकिस्तान भारतात घडवित असलेल्या सीमापार दहशतवादासंदर्भात अमेरिकेचे धोरण ‘असंवेदनशील’ आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील मतभेदांचेही हे एक प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांमध्ये भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारत आहेत. अमेरिकेशी होणार असलेल्या व्यापारी करार जवळपास पूर्णत्वास आलेला असला तरी, अमेरिकेच्या व्यापारशुल्क धोरणामुळे त्याला विलंब लागत आहे, अशीही कारणमीमांसा त्यांनी या मुलाखतीत केली.

या मुलाखतीत जयशंकर यांनी पाकिस्तानचे थेट नाव घेतले नाही. तथापि, त्यांचा रोख पाकिस्तानवरच होता, हे स्पष्ट होत आहे. त्यांनी ‘भारताचा शेजारी’ असा उल्लेख केला. भारताच्या या शेजाऱ्याने दहशतवादाचा उपयोग गेल्या अनेक दशकांपासून राजकीय शस्त्रासारखा केला आहे. भारताने ज्या प्रकारच्या दहशतवादाशी दोन हात केले आहेत, तशी वेळ जगातील फारच कमी देशांवर आली आहे. त्यामुळे भारतासाठी दहशतवादाचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे. अशा स्थितीत भारताची भावना लक्षात घेतली जात नसेल, तर ती एक मोठी समस्या असते, असेही प्रतिपादन जयशंकर यांनी या मुलाखतीत सोमवारी केले.

अमेरिकेच्या धोरणात परिवर्तन

भारताला होणारा शेजारी देशाच्या दहशतवादाचा त्रास अमेरिकेने लक्षात घेतलेला होता. तथापि, आता अमेरिकेच्या धोरणात परिवर्तन झालेले दिसते. अमेरिकेचे पाकिस्तानसंबंधातले धोरण आता वेगळे झालेले आहे. पाकिस्तानचा जागतिक दहशतवादात हात कसा आहे, याची जाणीव पूर्वीच्या अमेरिकेच्या प्रशासनांना होती. अल् कायदा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अमेरिकेकडून पाकिस्तानातच मारला गेला आहे. पाकिस्तानने त्याला आश्रय दिला होता, असे स्पष्ट आहे. या सर्व बाबी पूर्वी अमेरिकडून लक्षात घेतल्या जात होत्या. तथापि, आता परिस्थिती वेगळी झालेली दिसते. अमेरिकेचे धोरण आता भिन्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

चीनशी संबंधात सुधारणा

गेल्या दोन वर्षांमध्ये भारताचे चीनशी संबंधी सुधारले आहेत. 2024 पेक्षा 2025 मध्ये आणि 2025 पेक्षा आता 2026 मध्ये हे संबंध अधिक सुधारले आहेत. 2020 मध्ये भारत-चीन सीमेवर जो तणाव निर्माण झाला होता, तो आता निवळण्याच्या मार्गावर आहे. तथापि, याचा अर्थ दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये पायाभूत परिवर्तन झाले आहे, असे म्हणता येणार नाही, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

अमेरिकेशी व्यापार कराराचे काय…

अमेरिकेशी भारताचा मुक्त व्यापार करार जवळपास पूर्णत्वाला पोहचलेला आहे. तथापि, अमेरिकेच्या व्यापार शुल्क धोरणामध्ये झालेल्या परिवर्तनामुळे त्याला विलंब लागत आहे. अमेरिकेने व्यापार शुल्काविषयी निश्चित निर्णय घेतला, की हा करार मार्गी लागण्याची शक्यता आहे. सध्या भारताचा अमेरिकेशी व्यापार सुरळीत आहे. तथापि, कराराला विलंब लागू शकतो. विलंब लागला तरी चालेल, पण नंतर अडचणी निर्माण होऊ नयेत, अशी भारताची भूमिका आहे. भारत जागतिक महासत्तांशी समतोल संबंध राखत आहे. एका देशावर नको इतके अवलंबून न राहता सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मुख्य भाग आहे. प्रत्येक प्रमुख देशाशी भारताचे संबंध भिन्न भिन्न परिस्थितीनुसार आहेत. भारताचे सर्वाधिक हित कशात आहे, हे आम्हाला पहावे लागते. देशाची आर्थिक आवश्यकता, ऊर्जा आवश्यकता आणि राजकीय संबंध यांचा एकत्रित विचार करावा लागतो, अशीही मांडणी जयशंकर यांनी या मुलाखतीत केली. अमेरिका-इराण युद्ध आणि रशिया-युक्रेन युद्धाचाही त्यांनी संदर्भ दिला. या युद्धांमुळे परिस्थितीत बरेच परिवर्तन झाल्याचेही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

ड पाकिस्तानच्या दहशतवादाकडे दुर्लक्ष करणे भारताला कधीही नाही शक्य

ड जागतिक दहशतवादात पाकिस्तानची सक्रीय भूमिका अनेकदा झाली स्पष्ट

ड अमेरिकेचे व्यापार शुल्क धोरण निश्चित निर्धारित झाल्यानंतर करार शक्य

ड भारताच्या चीनशी संबंधात सुधारणा असली, तरी आम्ही सदैव दक्ष, सजग

Comments are closed.