महागाईचा धक्का

घरगुती सिलिंडर 29 रुपयांनी महाग : नव्या दरांची रविवारपासून अंमलबजावणीही सुरू

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशवासियांना महागाईचा आणखी एक धक्का देत सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ केली आहे. नवीन दरानुसार, दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 913 ऐवजी 942 रुपये झाली आहे. सुधारित दर तात्काळ लागू झाले असून रविवार, 7 जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी, 7 मार्च रोजी सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ केली होती. या सलग दुसऱ्या दरवाढीमुळे घरगुती ग्राहकांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडेल.

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भडका उडाल्यापासून देशभरात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केल्यानंतर आता घरगुती सिलिंडरचे दर दुसऱ्यांदा वाढवल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. सिलिंडरसोबत पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीचे दरही सातत्याने वाढत आहेत. मे महिन्याच्या मध्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण 7.50 रुपये प्रतिलिटरने वाढ झाली आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या दरातही अंदाजे 6 रुपये प्रतिकिलोग्रॅमने वाढ झाली आहे. या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनता आणि वाहतूक क्षेत्र या दोघांमध्येही चिंता वाढली आहे.

जागतिक ऊर्जा बाजारातील स्थिती कारणीभूत

उद्योग क्षेत्रातील सूत्रांनुसार, पश्चिम आशियातील सध्याचा भू-राजकीय तणाव आणि जागतिक ऊर्जा बाजारातील गोंधळामुळे एलपीजीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. अमेरिका-इराणमधील तणाव आणि या प्रदेशातील सागरी पुरवठा मार्गांना असलेल्या वाढत्या धोक्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जेच्या किमती उच्च पातळीवर राहिल्या आहेत. याचाच परिणाम आता देशांतर्गत बाजारावरही झाला आहे.

सरकारी कंपन्यांना मोठा तोटा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये दरवाढ होऊनही, सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांना घरगुती एलपीजी विक्रीतून मोठा तोटा होत होता. ताज्या दरवाढीपूर्वी कंपन्यांना प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे अंदाजे 703 रुपयांचा तोटा होत असल्यामुळे वाढलेल्या खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकणे आवश्यक मानले गेले. इतर इंधनांच्या किमतीही वाढवल्यानंतर आता एलपीजीच्या दरातही वाढ करणे क्रमप्राप्त झाले होते. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनुसार, अलीकडील दरवाढीनंतरही, सरकारी तेल कंपन्यांवर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीचा दबाव आहे. कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर अंदाजे 11 रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर 33.6 रुपयांचा तोटा होत असल्याचा अंदाज आहे.

विरोधी पक्षनेत्यांचा सरकारवर प्रहार ‘महागाईवाला मोदी’मुळे जनता त्रस्त : काँग्रेस

काँग्रेस पक्षाने दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत, पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महागाईवाला मोदी’ असे संबोधत सरकार सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा टाकत असल्याचा आरोप केला आहे. ‘मोदी सरकारचे धोरण स्पष्ट आहे. जनतेकडून पैसे उकळणे आणि आपल्या जवळच्या उद्योगपतींना फायदा मिळवून देणे’ असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

महागाईने लोकांचे कंबरडे मोडले : आप

आम आदमी पार्टीने (आप) सुद्धा गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या लोकांवर हे आणखी एक मोठे ओझे आहे. आपच्या मते, तीन महिन्यांत दुसऱ्यांदा सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे घरगुती बजेटवर थेट परिणाम होईल आणि सामान्य कुटुंबांचे हाल आणखी वाढतील, असे ‘आप’ने म्हटले आहे.

‘विश्वगुरु’ सरकार अपयशी : टीएमसी

तृणमूल काँग्रेसनेदेखील या निर्णयावर टीका केली असून, जागतिक संकटांचा संपूर्ण भार ‘विश्वगुरु’ सरकारकडून सर्वसामान्य लोकांवर टाकला जात असल्याचे म्हटले आहे. सरकारने भविष्यातील आव्हानांसाठी कोणतीही ठोस योजना न आखता भाववाढीचा भार थेट जनतेवर टाकला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस पक्षाने केला आहे.  श्रीमंतांसाठी ही दरवाढ किरकोळ असली तरी, लाखो कुटुंबांच्या घरगुती बजेटवर हा एक मोठा आघात असल्याचे टीएमसीने म्हटले आहे.

 

Comments are closed.