अभिनयाचा युगपुरुष
रायगड जिह्यातील मुरुड-जंजिरासारख्या छोटय़ाशा गावात जन्मलेल्या नाना पाटेकर यांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत दमदार अभिनयाच्या जोरावर पाच दशके मराठीसह बॉलीवूडवर अधिराज्य गाजवले. अभिनयासोबत सामाजिक बांधिलकीदेखील जपली. त्यांच्या जाण्याने अभिनयाचा युगपुरुष हरपला, अशी हळहळ व्यक्त होत आहे.
'हालचाल'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण
आपल्या पाच दशकांच्या प्रवासात नाना पाटेकर यांनी शंभरहून अधिक हिंदी, मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या. 'हालचाल'(1978) चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. फक्त 'हुक'(1986) या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली.
अभिनेता नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजिरा येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचा कापड व्यवसाय होता. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढे मुंबई गाठावी लागली आणि तिथून संघर्षाची नवी कहाणी सुरू झाली. नानांच्या अभिनयाची पहिली ठिणगीही मुरुडच्या वातावरणातच पडली. वडिलांना नाटक आणि तमाशाची आवड होती. त्यामुळे बालपणीच नाटकांचे प्रयोग पाहण्याची संधी नानांना मिळाली. स्थानिक नाटय़प्रयोगातून अभिनयाची आवड निर्माण झाली आणि पुढे याच आवडीने त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च स्थानापर्यंत नेले.
असे बनले बॉलीवूडचे नाना
नानांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर असे होते. शाळेत आणि कागदपत्रांवर याच नावाची नोंद होती. नाना हे नाव कसे पडले याबद्दल एका मुलाखतीदरम्यान त्यांनीच रंजक किस्सा सांगितला होता. ‘माझ्या आईची एक मैत्रीण होती. त्या लहानपणापासून मला नाना नावाने हाक मारायच्या. हळूहळू घरातील व परिसरातील सर्वच लोक मला ‘नाना’ म्हणू लागले.’ शाळा आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील जुने मित्रच त्यांना ‘विशू’ किंवा ‘विश्वनाथ’ या नावाने हाक मारायचे.
चित्रपटाचे पोस्टर रंगवायचे
नाना पाटेकर यांच्या कुटुंबाचा व्यवसाय होता. मात्र, एका व्यक्तीने केलेल्या विश्वासघातामुळे कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. या परिस्थितीत नानांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. चुनाभट्टी परिसरात ते चित्रपटांचे पोस्टर रंगवण्याचे काम करायचे. या कामासाठी ते दररोज जवळपास आठ
किलोमीटर पायी चालत जायचे. महिन्याकाठी त्यांना 35 रुपये मिळायचे.
रंगमंचावर नीलकांती यांच्याशी ओळख
नाना आणि अभिनेत्री-लेखिका नीलकांती यांची पहिली भेट मराठी नाटकाच्या रंगमंचावर झाली. त्यावेळी नीलकांती बँकेत अधिकारी म्हणून नोकरी करत होत्या त्याचसोबत आपली अभिनयाची आवडही जोपासत होत्या. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. 1978 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. माझ्या पत्नीचे माझ्यावर खूप उपकार आहेत, तिच्यामुळेच मी अभिनय क्षेत्रात करिअर करू शकलो, अशी जाहीर कबुली नानांनी दिली होती. नीलकांती यांनी दुर्वासा या मुलाला जन्म दिला, परंतु अडीच वर्षांचा असताना त्याचे निधन झाले. त्यानंतर मल्हार पाटेकर याचा जन्म झाला. मल्हार सध्या ‘नानासाहेब प्रॉडक्शन हाऊस’ सांभाळतो.
सिंहासन ते आपला माणूस
जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' या चित्रपटात नाना यांनी लहान पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. राजदत्त दिग्दर्शित 'अस्वल' चित्रपटातही त्यांनी लहान भूमिका साकारली. नानांना नायक म्हणून पहिली संधी 1982 मध्ये 'रघुमैना'या चित्रपटातून मिळाली. यात त्यांच्यासोबत नायिका मधू कांबीकर होत्या. 'देऊळ'मध्ये (२०११) त्यांनी स्थानिक राजकारणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळाले होते. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे'(२०१४) या चित्रपटात त्यांनी समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका साकारली. शिव मांजरेकर यांच्या 'नटसम्राट'(2016) मध्ये त्यांनी आप्पासाहेब बेलवलकरांची तर 'आपला माणूस'(२०१८) चित्रपटात त्यांनी गुन्हा ऑफिसरची भूमिका साकारली. शिव मांजरेकर यांच्या 'नटसम्राट'(2016) मध्ये त्यांनी आप्पासाहेब बेलवलकरांची तर 'काटकोन त्रिकोण' या नाटकावर आधारित 'आपला माणूस'(२०१८) चित्रपटात त्यांनी गुन्हा ऑफिसरची भूमिका साकारली.
बॉलीवूडच्या झगमगाटात मराठी संस्कृती जपली
बॉलीवूडच्या झगमगाटातही साधेपणाने आयुष्य जगता येते, हे नाना पाटेकर यांनी जगाला दाखवून दिले. ज्या इंडस्ट्रीत सेलिब्रिटींच्या पेहरावाचा अर्थ स्टायलिस्ट, महागडे ब्रँड्स, कोटय़वधींची घडय़ाळे असा असतो तिथे खादीचा कुर्ता, पायजमा आणि उपरणे. कधीकधी गांधी टोपी, गळय़ात साधा तावीज आणि साधी चप्पल अशा लूकमध्ये नाना सहजपणे वावरताना दिसायचे.
शंभरहून अधिक चित्रपटांत भूमिका
नाना यांची ‘परिंदा’मध्ये त्यांनी साकारलेली ‘अण्णा’ नावाच्या गँगस्टरची भूमिका गाजली. ‘क्रांतिवीर’मध्ये त्यांनी प्रताप नारायण टिळक भूमिका साकारली. पुढे ‘आज की आवाज’, ‘राजू बन गया जंटलमन’, ‘अंगार’, ‘अग्निसाक्षी’, ‘तिरंगा’, ‘हम दोनो’, ‘खामोशी’, ‘गुलाम-ए- मुस्तफा’, ‘अपहरण’, ‘शक्ती’, ‘सलाम बॉम्बे’, ‘यशवंत’, ‘युगपुरुष’, ‘अब तक छप्पन’, ‘काला’, ‘राजनीती’, ‘द अटॅक ऑफ 26/11’, ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक, ‘वनवास’, ‘हाऊसफुल्ल 5’ आदी चित्रपटांतील त्यांचा दमदार अभिनय प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाहीत.
तीन राष्ट्रीय पुरस्कार
‘परिंदा’ (1989) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, ‘क्रांतिवीर’ (1994) सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि ‘अग्निसाक्षी’ (1996) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘परिंदा’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, ‘अंगार’साठी सर्वोत्कृष्ट खलनायक आणि ‘क्रांतिवीर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता असे तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी 2013 साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ देण्यात आला होता.
‘प्रहार’साठी घेतले लष्करी प्रशिक्षण, कारगील युद्धादरम्यानही लष्करी सेवा
‘प्रहार’ या चित्रपटात त्यांनी मेजर चौहान यांची भूमिका साकारली. या चित्रपटात अभिनयासोबतच नानांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. ही भूमिका साकारण्यासाठी भारतीय लष्कराच्या मराठा लाइट इफ्रण्ट्रीसोबत लष्करी प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नाना टेरिटोरियल आर्मीमध्ये दाखल झाले आणि त्यांना मानद कॅप्टन म्हणून नियुक्त करण्यात आले. नंतर त्यांनी मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून सेवा बजावून 2013 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. 1999च्या कारगील युद्धादरम्यानही त्यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन लष्करासोबत दोन महिने सेवा बजावली होती. या काळात त्यांनी द्रास, लेह, कुपवाडा आणि सोपोर यांसारख्या भागांना भेट दिली.
माझ्या आयुष्यातली अत्यंत वाईट गोष्ट घडलीय. माझा अत्यंत जवळचा, जिवलग मित्र अचानक गेलाय. मला अजूनही या धक्कादायक बातमीवर विश्वास बसत नाहीय. तसे हृदयविकाराच्या झटक्याने त्याने जावे असे काही कारणच नव्हते. कारण फिजिकली एकदम फिट माणूस, कायम स्वतःचा फिटनेस जपणारा माणूस. वाह्यात गोष्टी त्याने कधीच केलेल्या नाहीत. अगदी शिस्तबद्ध आयुष्य जगणारा माणूस असा अचानक जाईल, यावर विश्वासच ठेवू शकत नाही.
अशोक सराफ
आज सकाळी सात वाजता शूटिंगला जाण्यासाठी निघालो होतो. त्याच वेळी अचानक नानांच्या निधनाची दुर्दैवी बातमी कळली. सगळं शूटिंग रद्द करून गोवा गाठलं. त्यांना शेवटचं पाहिलं. खरं सांगायचं तर असं काही घडेल याची कल्पनाही नव्हती. त्यांची तब्येत आणि राहणीमान उत्तम होतं. उद्या, परवा त्यांचं शूटिंगही होतं. पण नियतीने वेगळंच काही ठरवलं होतं. त्यांनी माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर खूप मोठा प्रभाव टाकला.
सयाजी शिंदे
माझा प्रिय मित्र नाना आता आपल्यात नाही, यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तेष्टांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि त्यांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
रजनीकांत
नाना गेले… या एका वाक्याने मन सुन्न, निःशब्द झाले. तुम्ही अभिनयाचे आकाश होतात, ज्याला तुलनेची सीमा नव्हती. तुमच्या अनोख्या शैलीने रसिकांच्या हृदयात अढळ घर केले. प्रत्येक रंग अभिनयात खुलून आला. पडद्यावर तुम्ही हीरो होतात, पण पडद्यामागे त्याहूनही मोठे. ‘ब्लफमास्टर’, ‘हाऊसफुल 5’मध्ये तुमच्यासोबत पडदा वाटून घेतला, हे माझे भाग्य. पण एका मराठी चित्रपटात तुमच्यासोबत काम करणे, ही अपूर्ण ओढ आयुष्यभर उरी राहील.
रितेश देशमुख
नाना खरं तर माझे मार्गदर्शक आणि मित्र होते. ते नेहमी खरे बोलायचे आणि प्रेमही तितक्याच हटके पद्धतीने व्यक्त करायचे. त्यांच्या हसण्याची आणि प्रेमाची कायम आठवण राहील. ‘हीरो बनने के चक्कर में ऍक्टर मत खोना’ हे त्यांचे शब्द आयुष्यभर मनात जपेन. आणखी एक म्हणजे त्यांच्यासोबत चहाचा कप आणि कॅरमचा डाव खेळता आला नाही, याची खंत मनात कायम राहील.
शाहरुख खान
‘राजू बन गया जंटलमन’ आणि ‘गँग’ या चित्रपटांमधील एकत्र काम करण्यापासून ते दादरमधील त्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी जाण्यापर्यंतच्या अनेक लहान-मोठय़ा आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या. जमिनीशी जोडलेले आणि अस्सल व्यक्तिमत्त्व असलेल्या नानांनी प्रत्येक भूमिका अत्यंत प्रभावीपणे, सखोलतेने आणि जिवंतपणाने साकारली. भारतीय पडद्यावरील त्यांच्या त्या खास आणि प्रभावी उपस्थितीची नक्कीच उणीव भासेल.
जुही चावला
काही व्यक्ती केवळ आठवणींपेक्षाही पुढे जाऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप सोडून जातात. नाना पाटेकरही त्यापैकीच एक होते. ‘गुलाम-ए-मुस्तफा’मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. नाना यांच्या मार्गदर्शनाने माझ्या अभिनयात खोली आणण्यास मोठी मदत झाली होती.
रवीना टंडन
नाना तुमच्यासोबत घालवलेले क्षण, संवाद, वादविवाद आणि तुमच्या हातचे जेवण नेहमी लक्षात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रकाश राज
48 तासांपूर्वी ‘शामेल’ वाजवले
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचा अवघ्या 48 तासांपूर्वीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. पणजी येथे आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नाना पाटेकर गोव्याचे पारंपरिक वाद्य ‘शामेल’ वाजवताना दिसले होते. या कार्यक्रमातील त्यांचा उत्साही सहभाग पाहता काही तासांतच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली आहे. नानांचा हा शेवटचा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसाठी भावुक करणारा ठरत असून आयुष्य किती अनिश्चित आणि अनाकलनीय आहे, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली आहे.
Comments are closed.